संगमनेरमध्ये रामकथेचा उत्साह; लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती
संगमनेर । झुंझार न्यूज
“प्रभू श्रीराम हे एकवचनी, एकबाणी आणि एकपत्नी अशा आदर्श तत्त्वांचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. त्यांचे जीवन संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असून, रामायणातील आदर्श केवळ ऐकण्यासाठी नसून आचरणात आणण्यासाठी आहेत. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे चरित्र हे प्राणिमात्रांसह मानवी जीवनातील दुःख, व्यथा आणि संभ्रम दूर करणारे आहे,” असे प्रतिपादन प्रख्यात रामकथाकार विदर्भरत्न ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी केले.

प.पू. गगनगिरी महाराज सप्ताहानिमित्त आयोजित अधिक मासातील आठव्या पर्वाच्या सहाव्या दिवशी रामकथा निरूपण करताना ढोक महाराज बोलत होते. यावेळी संगमनेरच्या सप्ताह स्थळी भाविकांच्या गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला.

रामायणातील प्रसंगांचे जिवंत दर्शन
ढोक महाराजांनी आपल्या ओघवत्या आणि रसाळ वाणीतून राम वनवास, केवट भेट, भरत मिलाप आणि चित्रकूट या प्रसंगांचे हुबेहूब वर्णन केले. रामायणातील माता कौशलेने भरतासाठी राजसिंहासनाला दिलेले अनुमोदन ही केवळ एक कृती नसून ती एक वैश्विक विचारधारा असल्याचे त्यांनी सांगितले. केवट प्रसंगाचे वर्णन करताना महाराज म्हणाले की, “भगवंताच्या चरणस्पर्शाने नाव पवित्र झाली, तर संत मीराबाईंच्या चरणस्पर्शाने घुंगरू पवित्र झाले.” भरताने श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून केलेला त्याग आणि अयोध्यावासीयांचा विरह पाहून उपस्थित भाविकांचे डोळे पाणावले.

पंढरपूर हे वारकऱ्यांचे न्यायपीठ
भक्तीमार्गाचे महत्त्व सांगताना ढोक महाराज म्हणाले की, “समस्त वारकऱ्यांचे न्यायपीठ पंढरपूर असून पांडुरंग हा त्या न्यायपीठाचा सर्वोच्च न्यायाधीश आहे. ज्या ठिकाणी निरपेक्ष सेवा आणि स्वार्थरहित कार्य असते, तिथे संत-महंतांचा ओढा आपोआप असतो.” त्यांनी गुंजाळवाडीतील आयोजनाची शिस्त आणि भव्यतेचेही कौतुक केले.

पत्रकार आणि समाजसेवकांचा सन्मान करा
कथा निरूपणादरम्यान महाराजांनी समाजातील विविध घटकांवर भाष्य केले. ते म्हणाले की, “रामकथेचा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात. त्यामुळे पत्रकार, डॉक्टर, आचारी यांसारख्या समाजहितैषी व्यक्तींना विनाकारण विरोध करू नका, तर त्यांच्या कार्याचा आदर करा.”

बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कथेचा आनंद द्विगुणित
कथेत तल्लीन झालेल्या ढोक महाराजांचे लक्ष समोर बसलेले माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे गेले. महाराजांनी आवर्जून थोरातांच्या उपस्थितीचा उल्लेख करताच संपूर्ण मंडप टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. “बाळासाहेब थोरात यांच्यासारखे लोकप्रतिनिधी कथेला उपस्थित राहतात, ही समाधानाची बाब असून त्यांच्यामुळे कथेचा आनंद वाढला आहे,” असे ढोक महाराज म्हणाले. यावेळी बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे आणि नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

मान्यवरांचे मनोगत
-
आमदार सत्यजित तांबे: “महाराष्ट्रातील कथाकारांमध्ये ढोक महाराजांचे स्थान सर्वोच्च आहे. त्यांच्या वाणीतून प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांचे दर्शन घडते. त्यांची साधी आणि रसाळ शैली सर्वांना मंत्रमुग्ध करणारी आहे.”
-
बाळासाहेब थोरात: “ढोक महाराजांचे दर्शन आणि त्यांच्या मुखातून रामकथा ऐकणे म्हणजे अमृतपानासारखे आहे. त्यांची विद्वत्ता आणि ओजस्वी वाणी ही दैवी देणगी आहे. तुळसीदासांच्या परंपरेतील भक्तीरस ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत.” थोरात यांनी यावेळी महाराजांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि शेतकरी सुखी होण्यासाठी भरघोस पावसाचे साकडेही घातले.

या सोहळ्यासाठी संगमनेर आणि परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते. रामकथेच्या निमित्ताने संपूर्ण परिसर राममय झाला होता.