आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे मालदाड येथील सेवा संस्कार संस्थेच्या श्रमशक्ती कृषि महाविद्यालयाच्या कृषीदूतांचे नुकतेच आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे उत्साहात व पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.


महाविद्यालयाच्या ‘कृषी जागरूकता कार्यानुभव’ (RAWE) आणि ‘कृषी औद्योगिक संलग्नक’ (AIA) या कार्यक्रमांतर्गत हे कृषीदूत काकडवाडी गावात वास्तव्यास राहणार आहेत. या कालावधीत ते शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.


हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष साहेबराव नवले पाटील यांच्या प्रेरणेने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन कार्यक्रम समन्वयक प्रा. निलेश तायडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. डी. तायडे आणि महाविद्यालयातील सर्व विषय विशेषज्ञांच्या सूचनेनुसार करण्यात आले आहे.


काकडवाडी गावात आर्यन नवले, गौरव पवार, यशराज निंबाळकर, करण मंडलिक आणि यशराज दातीर हे कृषीदूत मुक्कामी राहणार आहेत. हे विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान न देता, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतील आणि आपल्या अनुभवातून व आधुनिक ज्ञानाच्या आधारे त्यांना मार्गदर्शन करतील.


गावातील वास्तव्यादरम्यान हे कृषीदूत खालील विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत

सेंद्रिय शेती: विषमुक्त शेतीचे महत्त्व.
बीज प्रक्रिया: उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्यक पाऊल.
खत व्यवस्थापन: गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक.
शेतीपूरक व्यवसाय: दुग्ध व्यवसाय, चारा पिकांचे नियोजन आणि बायोगॅस.
आधुनिक सिंचन: पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धती.
फळबाग व्यवस्थापन: लागवडीपासून काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान.


यावेळी ग्रामविकास अधिकारी सौ. प्रतिभा गांधोळे, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कृषीदूतांच्या माध्यमातून आम्हाला आधुनिक शेतीची माहिती घरबसल्या मिळणार असल्याने शेती व्यवसायाला नवी दिशा मिळेल,” असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *