महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी बंडखोरी केल्याची चर्चा रंगली असतानाच, यात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव समोर आल्याने शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. संगमनेरमध्ये बुधवारी ठाकरे गटाच्या वतीने वाकचौरे यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली.
संगमनेर बस स्थानकासमोर आज बुधवारी शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. युवा नेते अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या बंडखोरीचा तीव्र निषेध करण्यात आला. ‘गद्दारांना माफी नाही’ अशा घोषणांनी संगमनेरचा परिसर दणाणून गेला होता. ज्या पक्षाने उमेदवारी दिली, ज्या निष्ठेच्या जोरावर जनतेने निवडून दिले, त्याच पक्षाशी आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा प्रतिकात्मक पुतळा भररस्त्यात जाळला.
या आंदोलनादरम्यान बोलताना अमर कतारी यांनी खासदारांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले की, शिर्डीच्या जनतेने आणि शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून ज्यांना निवडून आणलं, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला आहे. अशा गद्दारांना आता संगमनेर तालुक्यात पाऊल ठेवू देणार नाही. जर ते तालुक्यात आले, तर त्यांना शिवसैनिक आपल्या स्टाईलने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
राज्यातील या मोठ्या राजकीय उलथापालथीमुळे आता आगामी काळात ठाकरे गट आणि बंडखोर खासदार यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या बंडखोरीचा शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.”