आमदार अमोल खताळ यांची माहिती; पीएम-किसान योजनेचा 23 वा हप्ता वितरित

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 23 वा हप्ता देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील 59 हजार 403 शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 11 कोटी 88 लाख 6 हजार रुपयांची रक्कम थेट वर्ग करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केले जातात. शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके तसेच शेतीसाठी आवश्यक असलेल्या इतर खर्चांसाठी ही मदत उपयुक्त ठरत आहे. दरम्यान, कृषी विभागाने लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी, आधार क्रमांकाची बँक खात्याशी जोडणी आणि खात्याची माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन केले आहे.

ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करून पुढील हप्त्यांचा लाभ सुनिश्चित करावा, असेही विभागाकडून सांगण्यात आले आहे. तालुक्यातील 59 हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असून खरीप हंगामातील आर्थिक गरजा भागविण्यास मदत होणार आहे.

केंद्र शासनाच्या या योजनेचा संगमनेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट लाभ होत असून शेती उत्पादन वाढीसाठीही ही योजना महत्त्वाची ठरत आहे. विशेषतः खरीप पेरणीच्या काळात मिळणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना आवश्यक कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयोगी पडणार आहे.

 

– अमोल खताळ( आमदार)
……………………………………………………..

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *