प्रशासकीय अनास्था आणि पालकमंत्र्यांच्या शब्दालाही किंमत नसल्याने शेतकरी आक्रमक; माजी पंचायत समिती सदस्य सरूनाथ उंबरकर यांचे आवाहन
आश्वी । झुंझार न्यूज
गेल्या अनेक महिन्यांपासून आश्वी आणि जोर्वे परिसरातील शेतकरी महावितरणच्या लहरी कारभारामुळे त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही वीज पुरवठ्यात सुधारणा होत नसल्याने, अखेर लोकशाही मार्गाने लढा देण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. या प्रश्नी येत्या १ जुलै रोजी मांचीहिल फाटा येथे भव्य ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सरूनाथ उंबरकर यांनी दिला आहे.
आश्वी परिसरात गेल्या चार-पाच महिन्यांपासून कृषीपंप आणि गावठाण फिडरची वीज वारंवार खंडित होत आहे. महावितरणने दिवसातून ६ तास वीज देण्याचे मान्य केले असले, तरी प्रत्यक्षात तांत्रिक बिघाडामुळे जेमतेम दोन-तीन तास वीज मिळते. त्यातही विजेचा दाब (Voltage) कमी असल्याने मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या कडक उन्हाळा असल्याने विहिरींना पाणी असूनही केवळ वीज नसल्याने उभी पिके डोळ्यादेखत जळून चालली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हा स्वतःचा मतदारसंघ आहे. सरूनाथ उंबरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांना प्रत्यक्ष तीन-चार वेळा भेटून निवेदन देण्यात आले. तसेच जनसेवा कार्यालयातही अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या. मात्र, तरीही महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल झालेला नाही. “महावितरण प्रशासन पालकमंत्र्यांनाही जुमानत नाही की काय?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
“आम्ही मंत्र्यांचेच कार्यकर्ते आहोत, मात्र सर्वसामान्य जनतेचे हाल पाहून आता शांत बसणे शक्य नाही. पीक वाचवण्यासाठी आणि हक्काची वीज मिळवण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही,” अशा भावना उंबरकर यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आश्वी आणि जोर्वे परिसरातील सर्व वीज ग्राहकांना, शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना पक्ष, गट-तट बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रमुख मागण्या
१. शेतीसाठी पूर्ण दाबाने (High Voltage) अखंडित ८ तास वीज मिळावी. २. गावठाण फिडरला २४ तास अखंडित वीज पुरवठा व्हावा. ३. वारंवार होणारे तांत्रिक बिघाड कायमस्वरूपी दुरुस्त करावेत.
येत्या चार-पाच दिवसांत महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा केली नाही, तर १ जुलै रोजी होणारे रस्ता रोको आंदोलन अधिक तीव्र होईल, असेही उंबरकर यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडणार असून आता महावितरण काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.