आश्वी । झुंझार न्यूज

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या (SC Sub-classification) निर्णयाविरोधात संपूर्ण देशात पडसाद उमटत असतानाच, आता संगमनेर तालुक्यातील समस्त आंबेडकरी समाज या अन्यायाविरुद्ध एकवटला आहे. या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि तो रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या २ जुलै २०२६ रोजी संगमनेर शहरात ‘विराट महामोर्चा’ काढण्यात येणार आहे.

या महामोर्चाचे आयोजन ‘संगमनेर तालुका अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संयुक्त कृती समिती’च्या वतीने करण्यात आले आहे. या लढ्यात तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, बौद्ध उपासक-उपासिका, युवक-युवती, माता-भगिनी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.


मोर्चाची पूर्वतयारी आणि नियोजनाबाबत माहिती देताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करणे हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून, तो अनुसूचित जातींच्या एकसंध ताकदीमध्ये फूट पाडण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सामाजिक एकतेच्या आणि समतेच्या विचारांना हरताळ फासणारा हा निर्णय असून, यामुळे समाजाचे घटनात्मक आरक्षण धोक्यात येईल,” अशी भीती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा लढा केवळ एका जातीचा नसून संपूर्ण अनुसूचित जातीच्या अस्तित्वाचा आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


हा महामोर्चा २ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होईल. मोर्चाचा समारोप प्रांत कार्यालयावर होणार असून, त्या ठिकाणी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.


“उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे”, “संविधान बचाव” आणि “SC एकसंघ आहे, एकसंघ राहणार” अशा घोषणांनी या मोर्चाद्वारे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.

या ऐतिहासिक लढ्यात आपला सहभाग नोंदवून आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन संयुक्त कृती समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व आंबेडकरी बांधवांना आणि संविधानप्रेमी नागरिकांना करण्यात आले आहे.

गावोगावी जनजागृतीवर भर

महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर कृती समितीचे सदस्य सध्या संपूर्ण तालुक्यातील खेडोपाडी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन बैठका घेत आहेत. उपवर्गीकरणामुळे भविष्यात समाजाचे काय नुकसान होऊ शकते, याचे गांभीर्य कार्यकर्त्यांकडून समजावून सांगितले जात आहे. ‘प्रत्येक घर आणि प्रत्येक व्यक्ती’ या मोर्चाशी जोडली जावी, यासाठी कार्यकर्ते झटत आहेत.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *