सर्वत्र पाऊस पडून शेतकरी आनंदी व्हावा, मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची ईश्वराकडे प्रार्थना

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या सोबत अहोरात्र शेतात राबून मातीला सोनं बनवणारा बैल हा त्यांच्या कष्टाचा खरा साथीदार असतो .शेतकऱ्यांचे पशुधन हे त्याचे सर्वस्व असते. पशुधनावर प्रेम करणारा शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा असून त्याच्या जीवनामध्ये बैलपोळ्याचे महत्त्व मोठे असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. तर पावसाने ओढ दिल्याने पिके करपून जात असल्याने सर्वत्र चांगला पाऊस पडून राज्यभरातील शेतकरी आनंदी व सुखी होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

जोर्वे येथील संतसावली निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सौ कांचनताई थोरात, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांसह थोरात परिवारातील सदस्य व जोर्वे येथील  ग्रामस्थ व थोरात परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.


यावेळी माजी कृषि व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या जीवनामध्ये पशुधन अत्यंत मोलाचे असते.पुरातन काळापासून शेती कामासाठी बैलाचे मोठे योगदान राहिले आहे. शेतकऱ्यांचा मोठा जीव बैलामध्ये असून आजचा दिवस हा त्याचा सन्मान करण्याचा आहे. ग्रामीण भागामध्ये लहान थोरांमध्ये या सणाबाबत मोठा उत्साह असतो. महिला भगिनी पुरणपोळीचा नैवेद्य करून मोठ्या आनंदाने बैल व आपल्या पशुधनाची पूजा करतात. ही मोठी कृषी क्षेत्राची मोठी परंपरा राहिली आहे.

बदलत्या काळानुसार या सणांमध्ये बदल जरी झाला तरी बैलपोळ्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. कृषी औद्योगिक क्रांतीच्या धोरणानंतर सध्या सर्वत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती केली जात आहे. अशा यांत्रिक युगातही शेतकऱ्यांचे पशुधनावरील प्रेम कायम आहे.

शेतकरी कुटुंबामध्ये गाई, बैल दारासमोर असणे ही मोठी प्रतिष्ठा असते.

मात्र सध्या पावसाने मोठी उघड दिली असल्याने शेतकरी चिंतेत आहे सोयाबीन मकासह सर्व पिके धोक्यात आली आहे. अशा संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत असून त्याच्या शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे.

आपण राज्याचे कृषिमंत्री पद सहा वर्षे सांभाळले असून शेतकऱ्यांना कायम मदतीची भूमिका घेतली. कृषिमंत्री पदाच्या माध्यमातून राज्यातील तमाम शेतकरी बांधवांची सेवा करण्याची संधी मिळाली .या संधीचा उपयोग हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी केला असून शेतकऱ्याला सरकारने मदत केली पाहिजे हा आपला कायम आग्रह राहिला आहे.

याचबरोबर राज्यामध्ये सर्व भागात पाऊस नाही. त्या भागामध्ये चांगला पाऊस होऊन शेतीमध्ये समृद्धी निर्माण व्हावी व अलनिनोचे संकट टाळावे अशी प्रार्थना ही मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, दरवर्षी मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने आम्ही जोर्वे येथील संत सावली येथे पोळा उत्सव साजरा करत असतो. आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शेती आणि पशुधनामुळे समृद्धी असते त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने लोकनेते बाळासाहेब थोरात दरवर्षी आवर्जून सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जोर्वे येथे हा सन साजरा करतात.

यावेळी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात बैलपोळा जोरवे गावासह सर्वत्र साजरा करण्यात आला

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *