योगा सारख्या प्राचीन ज्ञानाचे जागतिक चळवळीत रूपांतर होणे हा भारत देशाचा मोठा गौरव असून,आरोग्यदायी जीवन शैलीसाठी योग साधनेचा स्विकार प्रत्येकाने करण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमिताने लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शैक्षणिक संकुला मध्ये योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तांत्रिक व अतांत्रिक शिक्षण संस्थां मधील विद्यार्थी, प्राध्यापक शिक्षक यांनी सामूहिक योग साधनेत सहभाग नोंदविला.
मंत्री विखे पाटील म्हणाले की,२०१४साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारताच्या योग साधनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यात यश मिळवले.सलग बारा वर्षे संपूर्ण जगात योग दिन साजरा होणे हे भारत देशाच्या प्राचीन ज्ञान परंपरेचा मोठा गौरव असून,प्राचीन ज्ञानाचे जागतिक चळवळीत रूपांतर झाल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना “आरोग्यदायी वृध्दत्वासाठी योग” आशी आहे. त्याचे महत्वही खूप मोठे असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,योग साधने करीता आयुष मंत्रालयाने घेतलेला पुढाकार महत्वपूर्ण असल्याने देशातील युवकांपासून ते जेष्ठ नागरीकांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग साधनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी सर्वानी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये गेल्या २७ वर्षांपासून योग साधनेबाबत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले जात आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून संस्थेअंतर्गत विशेष योग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. यासाठी क्रीडा शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. संस्थेत सध्या ६५ प्रशिक्षित योग शिक्षक विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून ग योग शिबिर घेतले जातात.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केवळ शैक्षणिक संकुलातच नव्हे, तर गावपातळीवरही योग शिबिरांच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती केली जाते. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनीही योग साधनेचे महत्त्व जाणावे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारावी, या उद्देशाने जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील संस्थेत उपक्रम सुरू केला. प्रत्येकाला शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे म्हणून प्रशिक्षित क्रीडा शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना कैवल्यधाम, लोणावळा येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
— डॉ. सुस्मिता विखे पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था.लोणी