लोणी । झुंझार न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू केलेल्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ (PM Kisan) योजनेचा २३ वा हप्ता जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील ५ लाख ६६ हजार ८०६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे एकूण १११ कोटी ३७ लाख २ हजार रुपयांचा निधी जमा झाला असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

थेट बँक खात्यात मदतीचा ओघ
केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये, तीन समान हप्त्यांत दिले जातात. यावेळच्या २३ व्या हप्त्यापोटी प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात २,००० रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्याला मिळालेल्या या मोठ्या निधीमुळे शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना ऐनवेळी आर्थिक मदत उपलब्ध झाली आहे.

तालुकावार लाभार्थ्यांची संख्या आणि प्राप्त निधी
पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तालुकावार लाभार्थी शेतकरी आणि त्यांना मिळालेला निधी खालीलप्रमाणे आहे:
१. संगमनेर: ५९,४०३ शेतकऱ्यांना ११ कोटी ८८ लाख ६ हजार रुपये.
२. नेवासा: ५४,५९८ शेतकऱ्यांना १० कोटी ९१ लाख ६ हजार रुपये.
३. पारनेर: ५१,१३६ शेतकऱ्यांना १० कोटी २२ लाख ७२ हजार रुपये.
४. श्रीगोंदा: ५०,२०१ शेतकऱ्यांना १० कोटी १८ लाख २ हजार रुपये.
५. कर्जत: ४४,०९५ शेतकऱ्यांना ८ कोटी ८१ लाख ९० हजार रुपये.
६. शेवगाव: ४३,७९८ शेतकऱ्यांना ८ कोटी ७५ लाख ९६ हजार रुपये.
७. पाथर्डी: ४०,९७० शेतकऱ्यांना ८ कोटी १९ लाख ४० हजार रुपये.
८. राहुरी: ३८,३६१ शेतकऱ्यांना ७ कोटी ७२ लाख ६२ हजार रुपये.
९. अकोले: ३५,०९० शेतकऱ्यांना ७ कोटी १ लाख ८० हजार रुपये.
१०. अहिल्यानगर: ३१,३५३ शेतकऱ्यांना ६ कोटी २७ लाख ६ हजार रुपये.
११. जामखेड: ३०,९१४ शेतकऱ्यांना ६ कोटी १८ लाख २८ हजार रुपये.
१२. कोपरगाव: २८,३६९ शेतकऱ्यांना ५ कोटी ७२ लाख ७८ हजार रुपये.
१३. राहाता: २४,७११ शेतकऱ्यांना ४ कोटी ९४ लाख २२ हजार रुपये.
१४. श्रीरामपूर: २२,६१२ शेतकऱ्यांना ४ कोटी ५२ लाख ४ हजार रुपये.

‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर‘
यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्य ठेवले आहे. केंद्र सरकारच्या ‘किसान सन्मान निधी’च्या धर्तीवरच राज्यातील महायुती सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला १२ हजार रुपयांचे आर्थिक संरक्षण मिळत आहे. कर्जमाफीपासून ते विविध सवलतींपर्यंत, आमचे सरकार नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे.”

जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा झाल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
