शिर्डी । झुंझार न्यूज  

 


“ज्या पावन भूमीतून श्रीसाईबाबांनी ‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रद्धा-सबुरी’चा संदेश दिला, त्या भूमीला कलंक लावण्याचे प्रयत्न आम्ही कधीही सहन करणार नाही. मला हिंदू असल्याचा सार्थ अभिमान आहे आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी तसेच समाजाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सदैव ठामपणे उभे राहू,” अशा शब्दांत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला.

Oplus_131072

शिर्डीतील एका वादग्रस्त घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना विखे पाटील बोलत होते.

Oplus_131072


शिर्डीच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगत विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, शिर्डीत घडलेल्या प्रकारातील दोषींना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. “विखे पाटील परिवार याप्रकरणी कोणतीही तडजोड करणार नाही. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तींना कायद्याचा धाक दाखवलाच जाईल,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

हिंदुत्व आणि सामाजिक सलोख्याची सांगड


आपल्या भाषणात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. मात्र, हिंदुत्वाचे रक्षण करतानाच श्रीसाईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारांचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शिर्डी हे जगभरातील भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. जेथे प्रश्न प्रेमाने सुटतात, तिथे प्रेमाचा मार्ग स्वीकारावा; पण जिथे धर्माच्या आणि समाजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो, तिथे संघटित होऊन उभे राहणे काळाची गरज आहे.”

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘झिरो टॉलरन्स


शहरातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या छेडछाडीच्या प्रकरणांवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांना कोणतेही राजकीय किंवा सामाजिक संरक्षण मिळता कामा नये. समाजाने अशा नराधमांविरुद्ध जागरूक राहून कठोर कारवाईसाठी प्रशासनावर दबाव निर्माण करावा,” असे आवाहन त्यांनी केले.


या मेळाव्याला आमदार संग्राम जगताप, हिंदू धर्मरक्षक सागर बेग यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि शिर्डी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही हिंदू समाजाच्या एकतेवर आणि संरक्षणावर आपली मते मांडली.

शेवटी, डॉ. सुजय विखे पाटील यांनी समाजाला संघटित, जागरूक आणि जबाबदार राहण्याचे आवाहन केले. “केवळ मोर्चे काढून चालणार नाही, तर आपल्या परिसरातील प्रत्येक चुकीच्या कृत्याविरोधात आवाज उठवणे ही आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी नमूद केले. या मेळाव्यामुळे शिर्डीत हिंदुत्वाचा हुंकार घुमल्याचे चित्र पाहायला मिळाले.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *