लोणी । झुंझार न्यूज 

 

आधुनिक शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि अथक परिश्रम यांच्या बळावर कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संगमनेर तालुक्यातील शिर्डी मतदारसंघातील रहिमपूर येथील प्रगतिशील शेतकरी गणपतराव बाळासाहेब शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर झाला असून राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.


मुंबई येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे, तसेच अहिल्यानगर जिल्हा उत्तर भाजपाचे उपाध्यक्ष सचिन शिंदे आणि पप्पू गाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गणपतराव शिंदे यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे राबविले आहेत. उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शाश्वत शेतीच्या माध्यमातून त्यांनी एक आदर्श उभा केला आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांवर पडला असून त्यांनीही आधुनिक शेती पद्धती स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. शेतीकडे व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टीने पाहत सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर त्यांनी कृषी क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे केवळ गणपतराव शिंदे यांचाच नव्हे, तर संपूर्ण परिसराचा आणि कष्टकरी शेतकरी वर्गाचा सन्मान झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


“काळ्या आईची निष्ठेने सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाचा हा राज्यस्तरीय गौरव असून, हा सन्मान संपूर्ण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. .

जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, आदींनी शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

गणपतराव शिंदे हे ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक आणि बाबळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राचे संपर्क शेतकरी आहेत आजपर्यंत बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहून आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले प्रवरा शैक्षणिक संकुलातील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या माध्यमातून देखील गाव पातळीवरती अनेक शेतकरी परिसंवाद घेत असताना शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान दिले आहे. स्वतः शेती बरोबरच नर्सरी व्यवसाय व्यवसायातून त्यांनी दर्जेदार अशी भाजीपाला होते विविध शेतकऱ्यांना पुरवले आहे आजही राज्यांमध्ये त्यांच्या भाजीपाला रोपांना मोठी मागणी आहे त्याशिवाय सामाजिक क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रातही गणपतराव शिंदे यांचे मोठे योगदान राहिले आहे. .

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *