संगमनेर । झुंझार न्यूज 

 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जातीय उपवर्गीकरणाच्या निर्णयाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये गुरुवारी एक भव्य ‘निळे वादळ’ धडकले. हजारो भीमसैनिकांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. शहरातून काढण्यात आलेल्या या विराट मोर्चाने संपूर्ण संगमनेर दणाणून सोडले. 

संगमनेर शहरात आज म्हणजे गुरुवारी दि २ जुलै अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. निमित्त होते सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जातीय उपवर्गीकरणाच्या निर्णयाचा निषेध! गुरुवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली. हातात निळे झेंडे आणि डोक्यावर निळी टोपी घातलेले हजारो युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या मोर्चाने शासनाचे लक्ष वेधून घेतले. घोषणाबाजीने आसमंत दुमदुमून गेला होता. पोलीस निरीक्षक बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आरक्षणात फूट पाडणे हे संविधानावरील संकट असल्याचे त्यांनी नमूद करत सुरेंद्र थोरात म्हणाले की, आपण सर्व बाबासाहेबांची लेकरे आहोत. आपल्या आरक्षणाचे तुकडे पाडण्याचा हा सरकारचा घाट आहे. १३ टक्के आरक्षणाला हात लावण्याचे धाडस करू नका. हा समाज कोणासमोरही वाकणार नाही!

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते, ज्येष्ठ नेते माणिकराव यादव रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके आणि पँथरचे नेते राजू खरात यांनीही उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे होणाऱ्या धोक्यांबाबत इशारा दिला. के. जी. भालेराव यांनी या निर्णयाची कायदेशीर बाजू सविस्तरपणे मांडली.

“हा भव्य मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. या ठिकाणी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सोपवले. या मोर्चात संगमनेर तालुक्यातील रिपाई, पँथर , वंचित बहुजन आघाडी आणि विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सभापती बाळासाहेब गायकवाड, कैलास कासार, योगेश मुन्तोडे, बापू रणधीर, प्रवीण गायकवाड, सोमनाथ गायकवाड, सम्राट पटेकर, किशोर चव्हाण, शशिकांत थोरात, अलका महांगडे, सुरेश रुपवते, रामभाऊ आरगडे, बाळासाहेब मोकळ, महिला रिपाई तालुकाध्यक्ष सौ रुपाली सोनवणे , सौ. वाघमारे, शिवाजी जगताप, ॲड. किरण रोहोम, बंटी यादव, भास्कर बागुल, अशोक गायकवाड, नगरसेवक दानिश भाई, संतोष रोहोम, रवि दिवे , बाळासाहेब कदम, शशीकांत दारोळे , विनोद गायकवाड, सचिन साळवे , सुनिल जाधव , बाळासाहेब मोकळ , विजय मुन्तोंडे निल बर्डे , संघर्ष दारोळे , राम दारोळे , शरद तपासे , मधुकर सोनवणे , बेबी वाघमारे , अलका माघाडे , संगिता मेढे , सरिता खरात, लोखंडे मॅडम , विजय खरात , सिध्दार्थ खरात , नानासाहेब कदम , राजेद्र जाधव, रमेश भोसले , केरु भोसले , अमोल कदम , नितिन पडघलमल , मिलिंद तुपसुंदर, भरत भोसले , पवन लोखंडे , दादू यादव, गोविंद सोनवणे , राजू सोनवणे यांच्यासह हजारो भीमसैनिकांनी या आंदोलनात ताकद दाखवून दिली.

जातीय उपवर्गीकरणाचा हा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या ‘निळ्या वादळा’ने सरकारला थेट आव्हान दिले असून, आता शासन यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *