पिंपरी-चिंचवड । झुंझार न्यूज

 


पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना मोशी येथील कचरा डेपोत घडली आहे. येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड मोठा डोंगर कोसळल्याने भीषण दुर्घटना झाली. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला असून, प्रशासकीय इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

बाळासाहेब आंबेडकरांकडून पाहणी आणि संताप


घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे नेते मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज सकाळी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी कोसळलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याची आणि बाधित इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि या संपूर्ण घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

प्रशासकीय हलगर्जीपणावर ओढले ताशेरे


यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शहरात दररोज १४०० ते १५०० टन कचरा जमा होतो, मात्र घनकचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय प्रशासकीय पातळीवर पूर्णपणे दुर्लक्षित आहे. कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या गॅसचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी शासकीय पातळीवर कोणतीही सक्षम यंत्रणा अस्तित्वात नाही, हा गंभीर प्रकार आहे. अशा घटना टाळण्यासाठी आता पूर्णवेळ शासकीय विभागाची (Dedicated Department) नितांत गरज आहे.”

या भीषण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राज्य सरकारने तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही आंबेडकरांनी यावेळी केली. केवळ तांत्रिक कारणे पुढे करून प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.


मोशी कचरा डेपोतील या दुर्घटनेत ज्या निष्पाप जीवांचा अंत झाला, त्यांना सर्व स्तरांतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. या घटनेनंतर कचरा डेपोतील सुरक्षिततेचा आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *