संगमनेर तालुक्यातील आश्वी – जोर्वे – संगमनेर या मुख्य रस्त्यावर वसलेल्या उंबरी बाळापूर गावातील मुख्य चौकात गेल्या एक शतकापासून ठामपणे उभे असलेले जुने आणि दुर्मीळ होत चाललेले भेंडीचे झाड मंगळवारी (दि. २८) पहाटे जीर्ण झाल्यामुळे कोसळले. अनेक पिढ्यांचा मूक साक्षीदार असलेले हे झाड कोसळल्यामुळे कापावे लागल्याने गावातील एका सुवर्णयुगाचा शेवट झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आश्वी – जोर्वे – संगमनेर मार्गावरून जाणाऱ्या – येणाऱ्या प्रत्येकाला या झाडाने नेहमीच सावली आणि आपलेपणा दिला. काळ बदलत गेला, गावाची रूपरेषा बदलली, रस्ते डांबरी झाले, मातीची घरे पक्की झाली; मात्र हे भेंडीचे झाड गावाची ओळख म्हणून तिथेच ठामपणे उभे राहिले. अनेक कडक उन्हाळे, मुसळधार पाऊस आणि निसर्गाची वादळे अंगावर झेलत या झाडाने पिढ्यानपिढ्या माणुसकीचा गारवा जपला होता. हे झाड पडल्याची बातमी समजताच ग्रामस्थांनी चौकात गर्दी केली. तर, ज्येष्ठ आणि तरुण नागरिकांनी आठवणींना उजाळा देखील दिला.
या झाडात केवळ लाकूड आणि फांद्या नव्हत्या, तर उंबरी बाळापूर गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे ताणेबाणे विणले गेले होते. पोळ्याच्या मिरवणूक, लग्नाच्या वराती, अध्यात्मिक आणि धार्मिक अशा हजारो कार्यक्रमाचे हे झाड साक्षीदार होते. भर दुपारी शेतातील कामे आटोपून येणाऱ्या थकलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मुख्य विसावा होता, तर लहान मुलांच्या खेळण्या-हुंदडण्याने अन् बालपणीच्या रम्य आठवणींनी हा परिसर सदैव गजबजलेला असायचा. इतकेच नव्हे तर गावातील ज्येष्ठांसह गाव पुढाऱ्यांच्या रंगणाऱ्या गप्पांच्या मैफली, सुख-दुःखाची देवाणघेवाण आणि सण-उत्सवातील आपुलकीच्या भेटीगाठींचे हे झाड शांतपणे साक्षीदार बनले होते.
झाडे ही फक्त निसर्गाची देणगी नसतात; ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि आठवणींची जपणूक करणारी जिवंत स्मारके असतात. एखादे जुने झाड तोडले की त्याच्यासोबत अनेक कथा, अनेक चेहरे आणि अनेक क्षणही कायमचे हरवून जातात. आज त्या झाडाची सावली नसली तरी त्याच्या आठवणी ग्रामस्थांच्या मनात कायम हिरव्यागार राहतील.
दरम्यान, या घटनेतून बोध घेत पुढच्या पिढ्यांना झाडांचे महत्त्व कळावे आणि सावली मिळावी यासाठी ‘प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवावे’, असा संकल्प ग्रामस्थांनी बोलून दाखवला.
“मंगळवारी जेव्हा ते झाड कापले गेले, तेव्हा गावाच्या इतिहासातील एक मौल्यवान अध्याय कायमचा संपला. झाड पडताना फक्त लाकूड जमिनीवर पडले नाही, तर अनेक पिढ्यांच्या असंख्य आठवणी, भावना आणि पिढ्यानपिढ्या जपलेला वारसा देखील कोसळला.”