आश्वी येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा व कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती संप्रन्न
आश्वी । झुंझार न्यूज
“देणगीदारांच्या योगदानामुळे आज हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक-एक रुपया जमा करून बहुजन समाजातील मुलांसाठी रयत शिक्षण संस्था उभी केली. जर ही संस्था सुरू झाली नसती, तर बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहिली असती. आज या संस्थेचा फार मोठा इतिहास असून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर अण्णांसारख्या महामानवांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात आत्मसात करणे गरजेचे आहे,” असे परखड विचार आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळाप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा निवृत्त सनदी अधिकारी (IAS) चंद्रकांत दळवी हे होते.
यावेळी आमदार रोहित पवार पुढे म्हणाले, “रयत शिक्षण संस्थेच्या ३४ प्राथमिक शाळा, ४३४ माध्यमिक शाळा, १९२ उच्च माध्यमिक शाळा, ४३ महाविद्यालये आणि ७९ वसतिगृहांच्या माध्यमातून दरवर्षी तब्बल ४ लाख १८ हजार मुले शिक्षण घेत आहेत. आश्वी येथील साडेसातशे विद्यार्थी हेदेखील याच रयत परिवाराचा एक हिस्सा आहेत. १८ ते २० हजार कर्मचारी या संस्थेत जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन काम करत आहेत.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की , “आपण कोठे जन्म घेतला यापेक्षा आपले आई-वडील आपल्यावर किती प्रेम करतात आणि कष्टाने आपल्या शिक्षणाला महत्त्व देतात, हे पाहा. आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि त्यांच्या कष्टाचे ऋण फेडा. संगणक शिक्षणापासून ते आजच्या आधुनिक शिक्षणापर्यंत खूप बदल झाला आहे. तर महामानवांनी कुटुंबासाठी नव्हे, तर समाजासाठी कार्य केले, म्हणूनच आजचा हा देश आणि महाराष्ट्र आपण पाहू शकत आहोत. संतांनी दिलेल्या माणुसकीच्या संदेशाला सर्वांनी प्राधान्य दिले पाहिजे.
यावेळी संस्थेचे माजी विद्यार्थी व थोर देणगीदार ॲड. अशोक बोरा यांनी इमारतीसाठी दिलेल्या मोठ्या देणगीचे कौतुक करत पवार यांनी हे त्यांच्यातील चांगल्या संस्कारांचे प्रतीक असल्याचे सांगितले. तसेच शरद पवार साहेब हे गेल्या ४० वर्षांपासून दूरदृष्टीने संस्थेच्या विकासासाठी काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत दळवी म्हणाले, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१० मध्ये वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी शिक्षणसेवेला प्रारंभ केला आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना एकत्र करून शाहू बोर्डिंगची स्थापना केली. आज त्याचे एका महावटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेतर्फे २२ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत कर्मवीर जयंती साजरी केली जाते. तर ॲड. अशोक बोरा यांनी दिलेल्या १ कोटी रुपयांच्या देणगीतून त्यांच्या मातोश्रींच्या नावाने ही भव्य इमारत उभी राहणार असून, बोरा यांच्यासारख्या देणगीदारांमुळे आश्वी शाखेचे नाव उज्ज्वल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ८७ व्या वर्षीही शरदराव पवार ज्या अभ्यासू वृत्तीने काम करतात, त्याचा दाखला देत विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सवय लावून घ्यावी आणि मोबाईलचा अतिवापर टाळावा, असे आवाहन दळवी यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी ध्येयनिश्चिती, वेळेचे नियोजन, नोट्स काढणे आणि शिस्त पाळण्यासाठी संस्थेने तयार केलेल्या विशेष शैक्षणिक खंडांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सुचवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे एन.सी.सी. व स्कॉड परेडच्या माध्यमातून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.
या सोहळ्यास संस्थेचे थोर देणगीदार ॲड. अशोक मुळचंदजी बोरा, संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, राजहंस दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर ,ॲड. संदीप वर्पे, प्रकाश निकम पाटील, किरण पाटील कडू, एकनाथ घोगरे पाटील, सुमतीलाल गांधी, बाळासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड, दीपक बोरा, विनायक बालोटे, सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच सुभाष म्हसे, डॉ. समीर शेख, सुशील भंडारी, भाऊराव कांगुणे, किशोर जऱ्हाड, नवनाथ आंधळे, संतोष ताजणे, सीताराम चांडे, सतीश होडगर, प्रभारी प्राचार्य दीपक चव्हाण, प्रभारी पर्यवेक्षक रमेश थेटे, भागवत उंबरकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.