प्रकल्पाला स्थगिती नसल्याचा दावा; जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य असल्याचे स्पष्ट
अहिल्यानगर । झुंझार न्यूज
प्रलंबित प्रकल्पाला स्थगिती दिल्याची चर्चा करून ५ तारखेला आंदोलन करण्याची घोषणा करणाऱ्या विरोधकांवर भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार निशाणा साधला. “जी गोष्ट झालीच नाही, त्यावर आंदोलन कशासाठी?” असा थेट सवाल करत प्रकल्पाला कोणतीही स्थगिती दिलेली नसल्याचा दावा त्यांनी केला. जलसंपदा विभागाकडून याबाबत लवकरच लेखी खुलासा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. ४० ते ५० वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला महायुती सरकारने मंजुरी आणि निधी उपलब्ध करून दिला आहे. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असताना आंदोलनाच्या माध्यमातून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका डॉ. विखे पाटील यांनी केली. मात्र, या प्रकल्पासाठी यापूर्वी ३० ते ४० वर्षे संघर्ष करणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्यासह इतरांचे योगदान नाकारत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “श्रेयासाठी भांडण्यापेक्षा प्रकल्प पूर्ण कसा होईल, यावर सर्वांनी भर दिला पाहिजे. जनतेला वस्तुस्थिती माहिती आहे,” असे ते म्हणाले.
दुष्काळी परिस्थितीवर सरकारचे लक्ष
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवरही डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाष्य केले. सरकारने परिस्थिती गांभीर्याने घेतली असून ‘ट्रिगर-१’ सक्रिय करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस न झाल्यास परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी विकासाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाच्या चर्चेवर स्पष्ट भूमिका
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
“जिल्हा बँकेच्या संदर्भात माझ्या नावाची चर्चा सुरू आहे, हे माझ्या कानावर येत आहे. मात्र, या पदासाठी मी कुठेही धावपळ करत नाही किंवा माझा कोणताही संघर्ष सुरू नाही. मुख्यमंत्री महोदय ज्याला योग्य समजतील, तोच व्यक्ती जिल्हा बँकेचा चेअरमन होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच आपल्या भविष्यातील वाटचालीबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केले. जागतिक स्तरावर, विशेषतः वर्ल्ड बँकेसारख्या संस्थांमध्ये किंवा देशाच्या तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळते का, याबाबत आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात सध्या तरी आपण सक्रियपणे पदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत त्यांनी दिले.
कौटुंबिक विषयांवर राजकारण न करण्याचे आवाहन
आमदार रोहित पवार यांच्याकडून होत असलेल्या कथित कौटुंबिक संदर्भातील राजकीय टीकेवरही डॉ. सुजय विखे पाटील यांनी भूमिका मांडली. “तुम्ही एका सुसंस्कृत परिवारातून आलेले लोकप्रतिनिधी आहात. कौटुंबिक विषय माध्यमांसमोर आणण्याचे काम ना पवार परिवाराने कधी केले, ना विखे पाटील परिवाराने केले. तुम्ही आमच्यावर राजकीय टीका करा, सरकारच्या कामावर टीका करा; मात्र कौटुंबिक वादामध्ये पडू नका,” असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा आणि राजकीय मर्यादा कायम राहणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी व्यक्तिगत आणि राजकीय आयुष्य यांच्यातील सीमारेषा पाळण्याचे आवाहन केले.
“राजकारणातील मर्यादा ओलांडल्या तर गलिच्छ राजकारणाला सुरुवात होईल. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जपण्याची जबाबदारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येक लोकप्रतिनिधीची आहे. कौटुंबिक टीका होऊ नये; अन्यथा राजकारणात कोणतीही लक्ष्मणरेषा उरणार नाही,” असे ते म्हणाले.
खासदारांच्या भूमिकेवरही टीका
महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला तडा देणाऱ्या राजकीय वक्तव्यांवर टीका करताना डॉ. विखे पाटील यांनी विरोधकांच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले. काही खासदारांचे ठरलेले डायलॉग असून, त्यांना स्वीडन कुठे आहे हेही माहिती नसल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे संबंधितांनी या विषयावर भाष्य करू नये, असे ते म्हणाले.
गेल्या दोन वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस निधी आणण्यात आणि कामे करण्यात अपयश आल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांऐवजी इतरांच्या कौटुंबिक विषयांचे राजकारण केले जात असल्याची टीका त्यांनी केली.
“माझी एकही बाईट दाखवा, ज्यामध्ये मी खासदारांच्या व्यक्तिगत आयुष्यावर किंवा चारित्र्यावर भाष्य केले आहे. व्यक्तिगत आयुष्यात कोणाच्याही जाणे योग्य नाही. महाराष्ट्रातील नेत्यांनी हा सुसंस्कृतपणा जपला आहे आणि तोच मी जपतोय,” असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले. जिल्ह्याच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी मुद्दे उरलेले नसल्याने काही जण इतरांच्या कौटुंबिक विषयांचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा राजकारणाबाबत जनतेने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
विकास आणि दुष्काळमुक्तीवर भर देण्याचे आवाहन
मागील पाच विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने विखे परिवाराला महाराष्ट्रातील पहिल्या पाच मताधिक्यांमध्ये स्थान दिल्याचा उल्लेख करत डॉ. विखे पाटील यांनी जनसामान्यांचे कल्याण हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी काम सुरू राहील, असे सांगत त्यांनी राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
प्रलंबित प्रकल्पाला स्थगिती नसल्याचा दावा, जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य असल्याची भूमिका, तसेच कौटुंबिक विषयांवरील राजकारणाला विरोध—या सर्व मुद्द्यांवर डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात या वक्तव्यांची चर्चा सुरू झाली आहे.