अहिल्यानगर जिल्ह्यातील कोकमठाण येथील ‘आत्मा मालिक ध्यान योग मिशन’च्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव २३ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या सात दिवसीय सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या सुमारे ४ ते ५ लाख भाविकांनी श्री सद्गुरु जंगलीदास माऊली यांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
महोत्सवाच्या सातही दिवसांत कोकमठाण परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. आलेल्या प्रत्येक भक्तासाठी अखंड अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. शिस्तबद्ध नियोजन आणि स्वच्छतेमुळे लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ अतिशय सुलभतेने घेतला.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे २३ जुलै रोजी श्री श्री १००८ महामंडलेश्वर परमपूज्य माँ कनकेश्वरी देवीजी यांच्या सुश्राव्य वाणीतून रंगलेली ‘श्री गुरुगीता कथा’. या कथेच्या श्रवणासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. भक्ती आणि ज्ञानाचा त्रिवेणी संगम या निमित्ताने भाविकांना अनुभवायला मिळाला.
गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. यामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, आबासाहेब थोरात यांचा समावेश होता.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आत्मा मालिक आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त हनुमंतराव भोंगळे , बाळासाहेब गोरडे, प्रकाश भट, सीए खर्डे, वसंतराव गायकवाड, अर्जुनराव डांगे, धर्मा गुरुसळे, विभाग प्रमुख साहेबराव गाडे, भाऊसाहेब जपे, बाळासाहेब डोळे, मृणाल डोळे यांच्यासह हजारो स्वयंसेवक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत, पण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या महोत्सवामुळे कोकमठाण परिसर पुन्हा एकदा अध्यात्माच्या ऊर्जेने उजळून निघाला आहे.