अहिल्यानगर । झुंझार न्यूज
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या या आधुनिक युगात अनेक प्राचीन परंपरा काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीने आपली मुळे घट्ट धरून ठेवली आहेत. आजही अनेक गावांमध्ये शेकडो वर्षांपासून चालत आलेला ‘आखाडी उत्सव’ (बोहडा) तेवढ्याच श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जात असून, लोककला, अध्यात्म आणि सामाजिक ऐक्याचा एक अनोखा संगम येथे पाहायला मिळत आहे.

लोककला व लोककलावंत अभ्यासक अरुण खरात यांनी या उत्सवाच्या जिवंत वैभवावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, हा उत्सव म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून ग्रामीण संस्कृतीचे अस्सल दर्शन घडवणारे व्यासपीठ आहे.
शेती आणि संस्कृतीचे अतूट नाते
आषाढ महिन्यात शेतीची मशागत आणि पेरणीची कामे पूर्ण झाल्यानंतर, निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आनंदाचा उत्सव म्हणून शेतकरी या उत्सवाची सुरुवात करतात. याला ‘दशावतार’ किंवा ‘बोहडा’ असेही संबोधले जाते. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव (वारी, सोनेवाडी, नगदवाडी), अकोले (गिरगाव, राजूर, शेंडी, भंडारदरा परिसर), राहाता (पिंपळवाडी) तसेच नाशिक जिल्ह्यातील चांदवड, वावी, चांदोरी आणि ठाणे-पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो.

सोंगांचे सादरीकरण आणि पौराणिक थरार
पाच ते सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज रात्री विविध पौराणिक पात्रांची ‘सोंगे’ नाचवली जातात. यामध्ये गणपती, सरस्वती, कंसवध, कालियामर्दन, नरसिंह अवतार, शिव-पार्वती आणि रावण अशा पात्रांचा समावेश असतो. रंगीबेरंगी वेशभूषा आणि हुबेहूब मुखवटे परिधान केलेले कलाकार जेव्हा वाद्यांच्या तालावर नाचतात, तेव्हा प्रत्यक्ष पुराणातील प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.

लिलाव आणि श्रद्धेची परंपरा
या उत्सवाचे एक वैशिष्ट्य म्हणजे सोंग नाचवण्याचा मिळणारा मान. अनेक गावांमध्ये सोंगांसाठी बोली लावली जाते. विशेषतः ‘नरसिंहाचे सोंग’ हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. हे सोंग घेणारा कलाकार दिवसभर कडक उपवास करून, विधीवत पूजा करूनच अवतार धारण करतो. काही घराण्यांमध्ये ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.

पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि कलाकुसर
हलगी, पिपाणी, सनई, संबळ आणि ढोल यांच्या कडकडाटात सोंगांचे सादरीकरण होते. सोंगांच्या मधल्या वेळात लोकनाट्य, तमाशा आणि लावणीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाते. या उत्सवासाठी लागणारे मुखवटे बनवण्याची प्रक्रियाही तितकीच विशेष आहे. पांगारा लाकूड, कागदाचा लगदा आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून हे मुखवटे तयार केले जातात, ज्यात लोककलावंतांचे कौशल्य पणाला लागते.

संवर्धनाची हाक
आखाडी उत्सवामुळे गावात सुख-समृद्धी नांदते आणि चांगला पाऊस पडतो, अशी ग्रामस्थांची धारणा आहे. महत्त्वाचे म्हणजे, आजची तरुण पिढीही या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत आहे.

“लोकसंस्कृती जिवंत राहिली तरच आपली ओळख टिकून राहील. त्यामुळे अशा प्राचीन परंपरांचे दस्तऐजीकरण आणि जतन करणे ही काळाची गरज आहे,” असे आवाहन अभ्यासक अरुण खरात यांनी केले आहे. शासनाने आणि समाजाने या लोककलावंतांना बळ दिल्यास, संस्कृतीचा हा दीप असाच अखंड तेवत राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
