संगमनेर । झुंझार न्यूज

 

 


संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. प्रवरा नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी गेलेला २५ वर्षीय तरुण पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.
​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषिकेश नवनाथ गडाख (वय वर्ष २५, रा. पारेगाव बुद्रुक) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असल्याचे समजते. ऋषिकेश हा आपल्या मित्रांसोबत प्रवरा नदी पात्रात आलेले पाणी पाहण्यासाठी गंगामाई घाटावर गेला होता. मात्र, नदीचा प्रवाह आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


घटना घडल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पथकासह संगमनेर नगरपरिषदेचे आपत्ती व्यवस्थापन व रक्षक दल तातडीने गंगामाई घाटावर दाखल झाले आहे. नदीपात्रात तरुण बेपत्ता झाल्याने युद्धपातळीवर शोधमोहीम देखील सुरू करण्यात आली आहे.



घटनेचे गांभीर्य ओळखून संगमनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, मुख्याधिकारी दयानंद गोरे पाणी पुरवठा सभापती मुजिबखान. यांच्यासह स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. शोधमोहिमेवर प्रत्यक्ष लक्ष ठेवले जात असून स्थानिक पाणबुडे आणि आपत्कालीन यंत्रणेच्या मदतीने तरुणाचा शोध घेतला जात आहे.

सध्या नद्यांना आलेला पूर आणि पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने नदीकाठी गर्दी करत आहेत. मात्र, असाच पाणी पाहण्याचा छंद आणि केलेला निष्काळजीपणा या तरुणाच्या जीवावर बेतला असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यात किंवा नदीपात्राजवळ न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *