आश्वी खुर्द परिसरात हळहळ

 

आश्वी । झुंझार न्यूज

 


आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथील धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आदर्श संस्कारी माता ग. भा. अंजनाबाई निवृत्ती गायकवाड (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आश्वी परिसरात मोठी शोककळा पसरली असून, एका संस्कारक्षम पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

अंजनाबाई गायकवाड या आश्वी खुर्द गावचे सलग १७ वर्षे सरपंचपद भूषविणारे दिवंगत नेते निवृत्ती गायकवाड यांच्या पत्नी होत. गावात एक आदर्श आणि सुसंस्कृत कुटुंब घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, चार मुली, जावई, पुतणे, नातू, नातसुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या मा. जि. प. सदस्य व ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब भोसले, माधवराव भोसले, गोविंदराव भोसले यांच्या भगिनी, तर सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष कै. गमाजी गायकवाड यांच्या भावजय होत. तसेच प्रवरा उद्योग समूहातील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड, प्रगतशील शेतकरी रविकिरण गायकवाड यांच्या त्या मातोश्री आणि आश्वी खुर्दच्या विद्यमान सरपंच सौ. अलकाताई बापूसाहेब गायकवाड यांच्या सासू होत.

अंजनाबाई यांच्या पार्थिवावर आश्वी खुर्द येथील प्रवरा नदीकाठी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास तांबे, माजी उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, माजी जि. प. सदस्य अण्णासाहेब भोसले, जनसेवा कार्यालयातील अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्कारांची दिशा देणारे व्यक्तिमत्व : शालिनीताई विखे पाटील


श्रद्धांजली अर्पण करताना सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, “अंजनाबाईंनी केवळ आपले कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण परिसराला संस्कारांची दिशा दिली. मूल्यधिष्ठित जीवन जगताना त्यांनी दिलेली संस्कारांची शिदोरी आजच्या पिढीसाठी सदैव दीपस्तंभ ठरेल.”