आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील चिंचपूर आणि सादतपूर परिसरात बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली आहे. चिंचपूर येथे बिबट्याने मानवी वस्तीवर हल्ला करून एका म्हशीच्या पारडाचा फडशा पाडला, तर जवळच असलेल्या सादतपूरमध्ये बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


चिंचपूर येथील पशुपालक नंदकुमार सुखदेव सातपुते (गट नंबर २९०/१) यांच्या वस्तीवर सोमवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला चढवला. सातपुते यांच्या घराजवळील गोठ्यात शिरून बिबट्याने एका म्हशीच्या पारडावर झडप घातली. या हल्ल्यात पारडू जागीच ठार झाले. बिबट्याचा हल्ला होताच कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड केली, त्यामुळे बिबट्याने तेथून जवळच असलेल्या शेतात पळ काढला. या घटनेमुळे सातपुते कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात घबराट पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरगडे यांनी वनविभागाला पाचारण केले. वनविभागाचे अधिकारी साळवे आणि वनरक्षक डेंगळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व मृत पारडाचा पंचनामा केला.

बिबट्याचा वावर आता थेट मानवी वस्तीपर्यंत वाढल्याने शेतकरी, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरगडे, पोलीस पाटील दत्तात्रय तांबे, माजी सरपंच शंकर तांबे, किसन तांबे, भाऊसाहेब तांबे यांनी वनविभागाकडे तीव्र मागणी केली आहे की, या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात तातडीने पिंजरा लावण्यात यावा. तसेच, पीडित शेतकरी नंदकुमार सातपुते यांना शासनाकडून तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


चिंचपूर येथील घटनेच्या दिवशीच जवळच असलेल्या सादतपूर येथील मगर वस्तीवरही बिबट्याचे दर्शन झाले. येथे बिबट्या दिवसाढवळ्या मांजर आणि कुत्र्याचा पाठलाग करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दिवसाही बिबट्याचा वावर मुक्तपणे सुरू असल्याने शेतमजुरांमध्ये भीतीचे सावट आहे.


वनविभागाने या दोन्ही गावांच्या परिसरात गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी आर्त हाक ग्रामस्थांनी दिली आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *