चौथ्या दिवशीही उपोषण सुरू ; छावा बिग्रेडचा आंदोलनाला पाठिंबा

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सिन्नर-खेड मार्गावरील विविध प्रलंबित कामांवरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि ठेकेदार कंपनीच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने चौथ्या दिवशीही हे आमरण उपोषण सुरू असून मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १२ वाजता हिवरगाव पावसा टोल नाका येथे थेट चितेवर (सरणावर) बसून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे व विद्यार्थी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन भोसले या दोघांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. येत्या २४ तासांत प्रशासनाने ठोस कारवाई सुरू न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी दिला आहे. या आंदोलनाला छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिन्नर-खेड महामार्गावरील प्रलंबित व अपूर्ण कामांबाबत १३ जुलै २०२६ रोजी प्रशासनाला पहिले निवेदन देण्यात आले होते. त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने २० जुलै २०२६ पासून उपोषण सुरू करण्यात आले. त्यावेळी NHAI च्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ५ दिवसांनी उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र, लेखी आश्वासन देऊनही महामार्ग प्राधिकरणाने आणि ‘शंकर रामचंद्र लिमिटेड’ या ठेकेदार कंपनीने प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू केली नाहीत. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनी पुन्हा एकदा उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उपोषणाला ४ दिवस उलटूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार कंपनीने आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. अधिकारी व ठेकेदार बिनधास्तपणे व सुस्तावल्यासारखे काम करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सततच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या पक्षाधिकाऱ्यांनी आता अत्यंत टोकाचा निर्णय घेतला आहे. हिवरगाव पावसा टोल नाका येथे पुढील २४ तासांत मागण्यांची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास थेट चितेवर (सरणावर) बसून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष अशोक काळे, महिला शहराध्यक्ष सरलाताई भुजबळ, रईस पठाण, अमोल म्हस्के, संतोष भुजबळ, ज्ञानेश्वर माळी, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली राऊत, छावा चा ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष प्रदीप आवटी, प्रवीण कासार, अजय शेळके, भाऊ म्हस्के, राजाराम शिंदे, दत्तात्रय वाकचौरे, जय बटवाल, ऋषिकेश गुंजाळ आदी सहभागी झाले होते.

 

ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही – जिल्हाध्यक्ष कपिल पवार

नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावर मागील सहा महिन्यात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. याची जबाबदारी कोण घेणार? १५ दिवसांपूर्वी आम्ही आंदोलन केले होते. तेव्हा आम्हाला टोल प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्यांनी कोणतेही काम सुरू केले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू करावे लागले आहे.आमचा पक्ष सत्तेत असताना सुद्धा आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येत आणि ठीम्म प्रशासन त्याची दखल घेत नाही यासारखी दुर्दैवी बाब नाही. जोपर्यंत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी दिला आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *