झरेकाठी । झुंझार न्यूज

 

 

प्रवारानगर येथे पारंपरिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी, पाणीटंचाई, दुष्काळ आणि मराठा आरक्षण आंदोलनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

: राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं गेल्या 76 वर्षांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या परंपरेचे यंदा 77 व्या वर्षात पदार्पण झाले. या पारंपरिक गणेशोत्सवाची सुरुवात आज सकाळी मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे यांच्या हस्ते गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.


अनेक भागांमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, राज्यासमोर सध्या एल निनोचे मोठे संकट आहे. पावसानं दडी मारल्यामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटाच्या काळात विघ्नहर्त्या गणरायानं बळीराजा आणि राज्यातील सर्व जनतेवरील विघ्ने दूर करावीत, अशी मनापासून प्रार्थना केली. शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याच्यासमोर निर्माण झालेल्या अडचणींची शासनाला पूर्ण जाणीव आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. राज्यसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई : राज्यातील पाणी टंचाईच्या परिस्थितीवर बोलताना विखे पाटील यांनी पाणी नियोजनाला शासनाकडून सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचं सांगितलं. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेऊन ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक पाणीसाठा राखून ठेवल्यानंतरच उर्वरित पाण्याचा शेतीसाठी वापर करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळं पाणी नियोजन करताना भविष्यातील गरजांचाही विचार केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
नुकसानीचा शासनाकडून आढावा : मराठवाडा आणि विदर्भातील पाणीटंचाई तसेच दुष्काळी परिस्थिती चिंताजनक असल्याचेही विखे पाटील यांनी नमूद केलं. या भागातील नुकसानीचा शासनाकडून आढावा घेतला जात आहे. मदत व पुनर्वसन विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नुकसानीची आकडेवारी आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर परिस्थितीनुसार योग्य ते ठोस निर्णय घेतले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागं घ्यावं : मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनांबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, मनोज जरांगे पाटील निरपेक्ष आणि निःस्वार्थी भावनेने समाजासाठी आंदोलन करत आहेत. काही मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. याचं सर्व श्रेय जरांगे पाटलांचे आहे. सरकार देखील संवेदनशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार संवेदनशील असून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागं घ्यावं अशी विनंती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *