जिल्हा सेक्रेटरीपदी ॲड. कॉ. सुधीर टोकेकर, तर अध्यक्षपदी कॉ. कारभारी उगले यांची एकमताने निवड
अहमदनगर । झुंझार न्यूज
भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय, अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा आयटक कामगार संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन कॉ. कारभारी उगले यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात पार पडले. ऑक्टोबर २०१९ नंतर तब्बल ५ ते ६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे जिल्हा अधिवेशन पार पडले असून, यावेळी संघटनेची नवी कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.
या अधिवेशनात अहमदनगर जिल्हा आयटकच्या सेक्रेटरीपदी ॲड. कॉ. सुधीर टोकेकर यांची, तर जिल्हा अध्यक्षपदी कॉ. कारभारी उगले यांची एकमताने निवड करण्यात आली.
अधिवेशनाची सुरुवात करताना जिल्हा सेक्रेटरी ॲड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी गेल्या पाच वर्षांतील कामाचा सविस्तर अहवाल सादर केला. जिल्ह्यात आयटकशी संलग्न असलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, पतसंस्था कर्मचारी संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना, अवतार मेहेर बाबा ट्रस्ट युनियन, मोहटादेवी कामगार युनियन, मढी देवस्थान, लालगीर बाबा ट्रस्ट, तलरेजा फर्म, पारनेर नगर पंचायत आणि मोलकरीण संघटनांच्या विविध मागण्यांसाठी लढा उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कामगारांचे किमान वेतन, प्रोव्हिडंट फंड (PF) व सेवाशर्ती लागू करण्यासाठी कामगार न्यायालयातही लढा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अधिवेशनातील महत्त्वाचे मुद्दे आणि मागण्या
अवतार मेहेर बाबा ट्रस्ट करार: लालबावटा युनिटचे अध्यक्ष कॉ. सतीश पवार आणि ॲड. कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. सुभाष लांडे यांनी केलेल्या तीन वर्षांच्या नवीन करारामुळे कामगारांना तब्बल ₹४,८०० ची भरघोस वेतनवाढ मिळाली आहे.
ग्रामपंचायत व आशा कर्मचाऱ्यांचे मानधन: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन २८ हजार रुपये करावे आणि आशा व गटप्रवर्तकांना २८ ते ३० हजार रुपये वेतन देऊन जुनी ६५ वर्षांची निवृत्तीची अट कायम ठेवत पेन्शन योजना लागू करावी, या मागण्यांसाठी लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संघटना वाढ: सध्या अहमदनगर जिल्ह्यात आयटकचे ७ ते ८ हजार सभासद कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्तरावर आयटक ही सर्वोच्च संघटना ठरली असून, देशात तिची सभासद संख्या १ कोटीच्या पार गेली आहे.
अधिवेशनात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल तंबाखू कामगार युनियनचे कॉ. प्रताप सहाणे आणि बिडी युनियनमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल कॉ. निवृत्ती दातीर यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. अधिवेशनात बोलताना अध्यक्ष कॉ. उगले यांनी कामगारांनी आपल्या हक्कांच्या सेवाशर्ती व मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले. आगामी नागपूर येथील राज्य अधिवेशन (३ व ४ ऑक्टोबर २०२६) आणि बेंगलोर येथील राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली.
या अधिवेशनाचे सूत्रसंचलन कॉ. सुरेश पानसरे यांनी केले, तर आभार कॉ. संदीप इथापे यांनी मानले.