{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

अहिल्यानगर । झुंझार न्यूज

निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधूंनी सुरू केलेले आंदोलन हे गमावलेली पक्षाची पत पुन्हा मिळविण्याची धडपड असल्याची टीका जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. या आंदोलनामागे राजकीय हेतू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्यासाठी हे आंदोलन पुरस्कृत करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला .

माध्यमांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील यांनी ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर भाष्य केले. दिल्लीतील आंदोलनानंतर देशभरात आपली लोकप्रियता वाढेल, असा काहींचा झालेला भ्रम आता दूर झाला असेल, असा दावा त्यांनी केला. आंदोलनामागे राजकीय उद्देश असल्याचे सांगताना त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेचाही संदर्भ दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, केजरीवाल जे बोलतात, त्याच धर्तीवर आंदोलनातील काही मुद्दे मांडले जात असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांवर निशाणा

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यापेक्षा सरकारच्या खांद्याला खांदा लावून मदतीसाठी पुढे येण्याची गरज असल्याचे विखे पाटील म्हणाले. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी विरोधकांनी पुढाकार घेतला, तर शेतकरी त्यांना दुवा देतील, असेही त्यांनी नमूद केले.

मात्र, विरोधकांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत करायची नसून केवळ या प्रश्नाचे राजकारण करायचे असल्याचा आरोप त्यांनी केला. कोविडच्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना काही मदत करता आली नाही, तर आता ते काय मदत करणार, असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केला.

सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. सरकार परिस्थितीबाबत संवेदनशील असून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

यापूर्वीही दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना विखे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त मदतीबाबत निर्णय होणार असल्याचे सांगितले होते. ५ ऑक्टोबरपर्यंत परिस्थितीचे अधिक स्पष्ट चित्र समोर येईल, असे त्यांनी म्हटले होते.

एनडीआरएफच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकार मदत करणार

एनडीआरएफकडून मदत मिळण्यापूर्वीच राज्य सरकार शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यासाठी पुढाकार घेईल, अशी ग्वाही ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांना मदत करण्याची कार्यपद्धती निश्चित असून त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर राजकारण करण्याऐवजी सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. महायुती सरकार शेतकऱ्यांना मदत करणारे सरकार असून, संकटाच्या काळात मदत करण्यात कोणतीही कमतरता राहणार नाही, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *