पुणे । झुंझार न्यूज

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव आणि भरती प्रक्रियेतील अनिश्चिततेविरोधात पुणे येथे सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माकप, एसएफआय आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. आंदोलनाचा काल पाचवा दिवस होता.

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. यावेळी माकपचे डॉ. महारुद्र डाके, एसएफआयचे राज्य सचिव सोमनाथ निर्मल, अभिषेक शिंदे, एकता सकराते, मोसिन बनकर, कृष्णा रक्ताटे, विलास साबळे, अखिल भारतीय किसान सभेचे किसन गुजर आणि विजय पाटील उपस्थित होते.

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता आणावी, पेपरफुटी व परीक्षेतील गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारी परीक्षा व भरती प्रक्रियेतील अनिश्चितता दूर करावी, रखडलेल्या भरती प्रक्रिया वेळबद्ध पद्धतीने पूर्ण कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

एसएफआयचे राज्य सचिव सोमनाथ निर्मल यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना, सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही तर एसएफआयच्या वतीने राज्यभर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी एसएफआय राज्यभरातील विद्यार्थी शक्तीला संघटित करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय किसान सभेचे किसन गुजर आणि विजय पाटील यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या रोजगाराचा आणि भवितव्याचा प्रश्न हा व्यापक जनतेचा प्रश्न असून, त्यांच्या संघर्षामागे किसान सभा ठामपणे उभी आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. अजित नवले म्हणाले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत, वेळ आणि पैसा खर्च करून आपल्या भवितव्याची तयारी करत असतात. परीक्षा प्रक्रियेतील वारंवार होणारे बदल, पेपरफुटी किंवा अनिश्चितता यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा आणि पारदर्शक, विश्वासार्ह व वेळबद्ध भरती प्रक्रिया सुनिश्चित करावी.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माकप, एसएफआय आणि किसान सभा यांचा पाठिंबा कायम राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *