ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मनाला तीव्र वेदना झाल्या. आपल्या कसदार अभिनयातून असंख्य व्यक्तिरेखा जिवंत करणारा प्रतिभावंत कलावंत, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती मनापासून संवेदना असणारा दिलखुलास मित्र आपण गमावला असल्याची भावना जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने भारतीय चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक, भावनिक आणि वास्तववादी व्यक्तिरेखा साकारत रसिकांच्या मनावर वेगळी छाप निर्माण केली. त्यांच्या अभिनयात सहजता, वास्तववाद आणि प्रभावी अभिव्यक्ती यांचा अनोखा संगम होता. ‘नटसम्राट’, ‘क्रांतीवीर’ यांसह त्यांच्या अनेक चित्रपटांतील भूमिका रसिकांच्या स्मरणात कायम राहतील, असे ना. विखे पाटील यांनी म्हटले.
नाना पाटेकर यांच्याशी आपले अतिशय आपुलकीचे आणि मैत्रीचे ऋणानुबंध होते, असे सांगताना ना. विखे पाटील यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. काही दिवसांपूर्वी नानांशी झालेल्या भेटीची आठवण सांगताना त्यांनी राज्यातील जलसंपदा कामे तसेच दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देण्याची नानांनी तयारी दर्शविल्याचे नमूद केले.
नाना पाटेकर यांनी केवळ चित्रपटसृष्टीतच आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला नाही, तर सामाजिक बांधिलकीही जपली. शेतकरी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांच्या अडचणींबाबत त्यांना विशेष आस्था होती. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून जलसंधारणाची कामे, दुष्काळग्रस्त भागातील उपक्रम तसेच शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यामुळे नाना हे केवळ अभिनेते नव्हते, तर सामाजिक जाणिवेने काम करणारे व्यक्तिमत्त्व होते, असे ना. विखे पाटील यांनी सांगितले.
दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नानांनी सातत्याने संवेदनशील भूमिका घेतली. ग्रामीण भागातील परिस्थितीची जाणीव ठेवून प्रत्यक्ष कामातून मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. त्यामुळे त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी जोडलेला एक संवेदनशील मित्र गमावल्याची भावना अधिक तीव्र होत असल्याचे ना. विखे पाटील यांनी म्हटले.
नाना पाटेकर यांच्या जाण्याने भारतीय कलाविश्वातील एक तेजस्वी पर्व संपले आहे. आपल्या अभिनयातून त्यांनी निर्माण केलेल्या असंख्य व्यक्तिरेखा आणि सामाजिक कार्यातून त्यांनी जपलेली माणुसकीची भावना कायम स्मरणात राहील. नाना पाटेकर यांच्या कुटुंबीय, आप्तेष्ट, सहकलाकार आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात आपण सहभागी असून, नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे ना. विखे पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले.