प्रवरा अभिमत विद्यापीठात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी

 

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

तुम्ही तुमच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली, तर पैसा आपोआप तुमच्याकडे चालत येतो. त्यामुळे पैशाला नव्हे, तर सेवेला सर्वोच्च प्राधान्य द्या. आपल्या कामात प्रावीण्य मिळवण्याची जिद्द आणि सेवाभाव कायम ठेवल्यास यशाचे मार्ग निश्चित सुकर होतात, असे प्रतिपादन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले.

प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (अभिमत विद्यापीठ) च्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने सिध्द हॉल येथे आयोजित डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील उपस्थित होते. तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (छत्रपती संभाजीनगर) उपसंचालक डॉ. मोनिका घुगे (सानप), विश्वस्त ध्रुव विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, कुलसचिव डॉ. रवींद्र लांबर, प्राचार्य डॉ. आर. के. सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते.

मुम्मका सुदर्शन पुढे म्हणाले, आई, वडील आणि गुरू हेच आपल्या जीवनातील मुख्य मार्गदर्शक असतात. गुरू केवळ ज्ञान देत नाहीत, तर जीवनाला योग्य दिशा आणि प्रेरणा देतात. विखे पाटील कुटुंबीयांच्या मूल्यांचा गौरव करताना ते म्हणाले की, डॉ. राजेंद्र विखे पाटील आणि ध्रुव विखे पाटील हे आपल्या पूर्वजांचा, विशेषतः वडील व आजोबांचा ज्या आदरभावाने गौरव करतात, हे संस्कार अत्यंत कौतुकास्पद आहेत. मोठ्या व्यक्तिमत्वांकडून प्रेरणा घेऊन समाजसेवा करण्याचा डॉ. कलाम यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे.

यावेळी डॉ. प्रदीप बोरकर संपादित फिजिओथेरपी कॉलेजच्या पॅराडाईम या वार्षिक मासिकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला प्राचार्य डॉ. आर. के. सिन्हा यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल अर्पा दरेकर, सानवी साळुंके, निमिष घोलप, हर्षमित सिंग सतनाम सिंग चुग, डॉ. प्रीती जाधव, डॉ. ध्रुवी सत्रा यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुषी झा व निमिष घोलप यांनी केले, तर डॉ. दिपाली होडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमात बोलताना डॉ. मोनिका घुगे म्हणाल्या, फळीच्या तळीची शाखा, सहवी भूमीसी उतरे ज्याप्रमाणे अफाट ज्ञान आणि कर्तृत्व असूनही डॉ. कलाम यांच्या ठायी असीम नम्रता होती. त्यांचे साधे राहणीमान आणि उच्च विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी लावलेल्या जनसेवेच्या रोपट्याचा पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीने आज एक भव्य वटवृक्ष झाला आहे. त्यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान भावी पिढ्यांसाठी कायम मार्गदर्शक ठरेल.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *