पानोडीत नवनिर्वाचित संचालक रणजितसिंह देशमुख यांचा सत्कार
जिल्हा बँकेच्या शाखेची केली पाहणी
आश्वी । झुंझार न्यूज
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील पूर्व भाग आणि पठार भागातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्याच्या निमित्ताने बिनविरोध निवड झालेले नवनिर्वाचित संचालक रणजितसिंह देशमुख आणि उमेदवार गणपतराव सांगळे यांनी पानोडी येथे भेट दिली. यावेळी पानोडी ग्रामस्थांच्या वतीने रणजितसिंह देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान देशमुख यांनी पानोडी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. तसेच शाखेतील कामकाजाची माहिती घेत समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले की, आजच्या नव्या पिढीला सहकार चळवळीची ओळख करून देणे आणि सहकाराचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे. सहकार चळवळ ही शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये सहकारी संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. जुन्या पिढीतील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यासह जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या दूरदृष्टीतून आणि कष्टातून सहकार क्षेत्राची भक्कम पायाभरणी झाली. त्यामुळे या चळवळीचा वारसा जपण्याबरोबरच तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये संगमनेर तालुका हा मुख्य दुवा असल्याचे नमूद करताना देशमुख म्हणाले की, तालुक्यातील सहकारी संस्थांनी प्रगतीची दिशा कायम ठेवली आहे. सहकार क्षेत्रातील या संस्थांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी महत्त्वाचा आधार मिळतो. सहकारी संस्थांचे बळ वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.
आपले नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना देशमुख म्हणाले की, त्यांची प्रामाणिकपणे आणि ध्येयाप्रती निष्ठा ठेवून काम करण्याची पद्धत नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. त्यांच्या विचारधारेतून आणि मार्गदर्शनातून माझ्यासारख्या तरुणाला जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठांनी निर्माण केलेला विश्वास आणि परंपरा पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
पानोडी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला भेट देताना रणजितसिंह देशमुख यांनी तेथील कामकाजाची माहिती घेतली. बँकेच्या माध्यमातून शेतकरी आणि सभासदांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या अनुषंगाने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जिल्हा बँक आणि सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याने या संस्थांचे कामकाज अधिक सक्षम होणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यभान थोरात होते. यावेळी उमेदवार गणपतराव सांगळे, गिरी, राजहंस दूध संघाचे संचालक विक्रम थोरात, संरपच गणपत हजारे , विनायकराव थोरात, सोसायटीचे चेअरमन बबनराव कराड, जालिंदर तळेकर, माणिक पाबळ, शरदराव जाधव, गोपाळ थोरात, बाळासाहेब सानप, बाळासाहेब तळेकर, विठ्ठल घोडेकर, संपत तळेकर, राम पाबळ, देवराम हजारे यांच्यासह विविध कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोसायटीच्या सभागृहातील ऐतिहासिक छायाचित्रांनी वेधले लक्ष !
पानोडी येथील सोसायटीच्या सभागृहात लावण्यात आलेली सरदार शिवराव थोरात यांची प्रतिमा, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमांनी रणजितसिंह देशमुख यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमा पाहून त्यांनी कुतूहल व्यक्त केले. या प्रतिमांचा ऐतिहासिक संदर्भ आणि सभागृहातील त्यांचे स्थान याबाबत उपस्थितांमध्येही चर्चा झाली. या छायाचित्रांचे छायाचित्रण करण्याचा मोह देशमुख यांना आवरता आला नाही. सहकार क्षेत्राच्या इतिहासाशी आणि जुन्या पिढीच्या विचारांशी नाते सांगणाऱ्या या प्रतिमांमुळे सभागृहातील वातावरण विशेष लक्षवेधी ठरले.