एन.डी.एम.जे.चे राज्य सचिव वैभव गिते यांची मागणी; खटला तातडीने निकाली काढून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी
शिर्डी । झुंझार न्यूज
मुख्यमंत्री यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्र शासनाने नव्याने स्थापन करण्याचा निर्णय घेतलेल्या अनन्य विशेष न्यायालयामध्ये सागर शेजवळ हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी केली आहे. हा खटला तातडीने निकाली काढून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशीही भूमिका त्यांनी मांडली.
वैभव गिते हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी शिर्डी येथे सागर शेजवळ हत्याकांडातील त्यांचे लहान भाऊ आकाश शेजवळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खटल्याची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली न्यायालयीन प्रक्रिया आणि कुटुंबीयांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली.
गिते म्हणाले की, एन.डी.एम.जे. संघटनेच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यात पाच अनन्य विशेष न्यायालये स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत ज्या जिल्ह्यांमध्ये अत्याचाराचे गुन्हे अधिक आहेत, अशा जिल्ह्यांमध्ये अनन्य विशेष न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार विधी व न्याय विभागाने शासन निर्णय जारी केला असून, त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातही एका अनन्य विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सुमारे दहा वर्षांपूर्वी घडलेले सागर शेजवळ हत्याकांड महाराष्ट्रभर गाजले होते. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलने झाली होती. आजही या खटल्याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. सध्या हा खटला राहाता न्यायालयात अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, नव्याने अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय झाल्याने सागर शेजवळ खून प्रकरणाचा खटला या नव्या न्यायालयात वर्ग करून त्याची सुनावणी पूर्ण करण्यात यावी. न्यायप्रक्रियेला गती देऊन पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळावा आणि दोषींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी वैभव गिते यांनी केली.
सागर शेजवळ हत्याकांडातील पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी नव्या विशेष न्यायालयाचा उपयोग व्हावा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा खटला लवकरात लवकर निकाली निघावा, हीच आमची भूमिका असल्याचेही गिते यांनी स्पष्ट केले.