लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू व्हावे, अशी व्यक्त केली सदिच्छा

संगमनेर । झुंझार न्यूज

देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते तथा खासदार शरदचंद्रजी पवार हे सध्या मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईक विचारपूस करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषिमंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी थोरात यांनी पवार साहेबांच्या तब्येतीची सविस्तर चौकशी करत त्यांना लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभावे आणि ते पुन्हा पूर्ण क्षमतेने जनसेवेच्या कार्यात रुजू व्हावेत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.


मागील दोन दिवसांपासून खासदार शरदचंद्रजी पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती समजल्यानंतर राज्यभरातील विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. पवार साहेबांच्या प्रकृतीबाबत महाराष्ट्रातील जनतेमध्येही काळजी आणि आपुलकीची भावना व्यक्त होत आहे.


दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी काल नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले. आज दुपारी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवार साहेबांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केली. तसेच त्यांच्या लवकर प्रकृतीसुधारणेसाठी शुभेच्छा दिल्या.
शरदचंद्रजी पवार हे देशाच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील ज्येष्ठ नेतृत्व असून महाराष्ट्राच्या विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. विशेषतः शेती, सहकार, ग्रामीण विकास आणि शेतकरी हिताच्या प्रश्नांशी त्यांचा दीर्घकाळ संबंध राहिला आहे. त्यामुळे पवार साहेबांनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी सक्रिय व्हावे, अशी भावना बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.


दिवाळीच्या शुभपर्वाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि अनुभव यापुढेही लाभत राहावेत, अशी अपेक्षाही थोरात यांनी व्यक्त केली. पवार साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
या भेटीप्रसंगी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *