प्रवरा ग्रामीण पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे थोरात यांच्या हस्ते उद्घाटन; तालुक्यात १३४ पतसंस्थांच्या २ हजार ४०० कोटींच्या ठेवी
संगमनेर । झुंझार न्यूज
सहकार चळवळीने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. संगमनेर तालुक्यात पतसंस्था आणि दूध संस्थांची एकमेकांना पूरक अशी व्यवस्था निर्माण झाल्याने सहकाराची भक्कम चळवळ उभी राहिली आहे. आज तालुक्यात १३४ पतसंस्था असून, त्यांच्याकडे सुमारे २ हजार ४०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यामध्ये प्रवरा ग्रामीण पतसंस्थेचे योगदानही मोलाचे आहे. सहकारी संस्थांनी भविष्यातही पारदर्शक, काटकसरीचा आणि सभासदांच्या हिताचा कारभार करून सहकार चळवळ अधिक मजबूत करावी, या सहकारी संस्थांमुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण झाले असल्याचे असे प्रतिपादन मा. महसूल व कृषी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

धांदरफळ खुर्द येथे प्रवरा ग्रामीण पतसंस्थेच्या स्वमालकीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते उत्साहात झाले. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात, माधवराव कानवडे, पांडुरंग घुले, तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय फटांगरे, रामहरी कातोरे, रमेश गुंजाळ, विलास कवडे, विजय राहणे, मारुती कवडे, संपतराव डोंगरे, मुरलीआप्पा खताळ, शरद नाना थोरात आणि ह.भ.प. सुदाम महाराज कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, १९८९ मध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात पतसंस्था चळवळीला खऱ्या अर्थाने गती मिळाली. संगमनेर तालुक्यात पतसंस्थांना दूध संस्थांची जोड देण्यात आली. त्यामुळे आर्थिक व्यवहारांसोबतच वसुलीची हमी निर्माण झाली. आज राज्यात सुमारे ३३ हजार पतसंस्था कार्यरत आहेत. संगमनेर तालुक्यातील पतसंस्थांची प्रगती ही येथील सभासद, कार्यकर्ते आणि सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मेहनतीचे फलित आहे. प्रवरा ग्रामीण पतसंस्थेचे १० कोटी रुपयांचे भागभांडवल असून, संस्थेने स्वतःची नवी वास्तू उभी करणे ही अभिमानाची बाब आहे.

सहकार ज्या ठिकाणी कमकुवत झाला, त्या ठिकाणी पतसंस्थांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना होणारा त्रास चिंताजनक आहे. आपण पतसंस्था आणि दूध संस्था चांगल्या पद्धतीने चालवल्या, त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्थैर्य मिळाले. तालुक्यातील दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अमृतवाहिनी बँक यांसारख्या सहकारी संस्था सक्षमपणे सुरू आहेत. भविष्यात या संस्था आणखी चांगल्या कशा होतील, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.

राज्यातील साखर कारखाने सध्या अडचणींचा सामना करत आहेत. दूध व्यवसायातही खासगी संस्थांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, खासगी संस्थांचे व्यवहार शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत की नाहीत, याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. सहकारी दूध संघांच्या अस्तित्वामुळे खासगी संस्थांनाही शेतकऱ्यांना चांगला भाव द्यावा लागतो. सहकार टिकला, तरच शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे हित सुरक्षित राहील. संस्थांचा कारभार काटकसरीने आणि जबाबदारीने चालविल्यामुळेच ही प्रगती शक्य झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती अधिक गंभीर आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि शेतीच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दररोज अकरा तास हक्काची वीज मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या या मूलभूत प्रश्नांसाठी प्रसंगी संघर्ष करण्याचीही तयारी ठेवावी लागेल, असे आवाहन थोरात यांनी केले.
प्रवरा ग्रामीण पतसंस्थेची नूतन वास्तू ही केवळ इमारत नसून, सभासदांच्या विश्वासातून आणि सहकाराच्या सामूहिक प्रयत्नांतून उभे राहिलेले यशाचे प्रतीक आहे. सहकाराची ही परंपरा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे संपतराव डोंगरे मुरली आप्पा खताळ यांनीही मनोगती व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता कोकने यांनी केले तर सतीश खताळ यांनी आभार मानले. यावेळी धांदरफळ गावातील व पंचक्रोशीतील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

