पुणे : झुंजार न्यूज माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री व भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय 72 वर्षांचे होते.
गेल्या अनेक महिन्यापासून त्यांच्यावर घरी तसेच रुग्णालयात उपचार सुरू होते. कसबा मतदार संघातून तीन वेळा नगरसेवक, 1995 पासून पाच वेळी आमदार आणि विद्यमान खासदार राहिले होते. कामगार संघटनेतून त्यांनी राजकीय आणि सामाजिक कारकीर्द सुरू केली होती. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्वाची खाती सांभाळली. पुणे शहरात दांडगा जनसंपर्क, पक्ष ओलांडून असलेले सर्वसमुदाया सोबत स्नेहसंबंध अशी त्यांची ओळख होती. अनेक कार्यकर्ते, नेते त्यांनी पुण्यात घडवले. आणीबाणीत 19 महिने त्यांनी नाशिक जेल मधे तुरुंगवास भोगला. काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने तब्येत खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे निधनाचे वृत्त येताच विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी बापट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आज सायंकाळी 7 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.