पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी करण्यासाठी
राज्य सरकारची उपसमिती गाझियाबादला रवाना

मुंबई : झुंजार न्यूज      

दादर येथील इंदू मिलमध्ये उभे राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे यथायोग्य निरीक्षण करण्यासाठी राज्य सरकारची विशेष उपसमिती गुरुवारी सकाळी गाझियाबादला रवाना झाली. त्यामुळे आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने पुतळ्याला मंजुरी न दिल्याने हे काम काहीसे रखडले आहे.

दादर येथील इंदू मिलमध्ये उभे राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आकार घेत आहे. मात्र या प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पुतळ्याचा निर्मितीत काही त्रुटी असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारची विशेष उपसमिती गुरुवारी सकाळी गाझियाबादला रवाना झाली. ही समिती पुतळ्याच्या २५ फुटी प्रतिकृतीची पाहणी करणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी घेऊन पुतळ्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१५ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरुवात झाली. करारानुसार स्मारक फेब्रुवारी २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे प्रकल्पाला विलंब झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अद्याप राज्य सरकारची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प वेग घेऊ शकलेला नाही. पुतळ्याची उंची आणि प्रतिकृतीत अनेक बदल सुचविण्यात आले असून त्यानुसार पुतळ्याला अंतिम रूप देऊन त्यास राज्य सरकारची मंजुरी घेणे आवश्यक आहे. ही प्रकिया रखडल्याने स्मारकाचे कामही संथगतीने सुरू आहे.

सामाजिक न्याय विभागाने पुतळ्याच्या प्रतिकृतीला अंतिम रूप देण्यासाठी उपसमिती नेमली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांच्यासह १४ जणांचा त्यात समावेश आहे. या उपसमितीमधील सदस्य गुरुवारी सकाळी गाझियाबादला रवाना झाले. ज्येष्ठ आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार हा पुतळा घडविणार असून गाझियाबादमधील त्यांच्या कार्यशाळेत पुतळ्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

सर्वात उंच पुतळा

इंदू मिलमधील स्मारकात चबुतऱ्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४५० फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. चबुतऱ्याची उंची १०० फूट असून पुतळ्याची उंची ३५० फूट असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील हा सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. मात्र अन्य महापुरुषांच्या पुतळ्यांच्या तुलनेत डॉ. आंबेड़कर यांचा हा जगातील तिसरा उंच पुतळा असेल, असा दावा करण्यात आला आहे.

२७ टक्के काम पूर्ण

स्मारकाच्या कामाला २०१८ पासून सुरुवात झाली असून आतापर्यंत प्रकल्पाचे २७ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील पायाभूत इमारतीचे ५३ टक्के, तर पुतळ्याचे १२ टक्के काम पूर्ण झाले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed