सांगली : झुंजार न्यूज
राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. नवे मुख्यमंत्री म्हणून विखे पाटलांचं नाव आघाडीवर आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना देखील मुख्यमंत्रीपद मिळू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री होण्याची स्पर्धा सुरू आहे. मला सुद्धा मुख्यमंत्री व्हावे वाटते. भविष्यात दलित मुख्यमंत्र्याबाबत विचार झाला तर आपल्या नावाचा विचार व्हावा असं आठवले यांनी म्हटलं आहे.
आठवले नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्रीपदाबाबत चढाओढ सुरू आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हास्यास्पद आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. पण जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत दुसऱ्या कोणाचा नंबर लागणार नाही. मला सुद्धा मुख्यमंत्री व्हावे वाटते. भविष्यात दलित मुख्यमंत्र्याबाबत विचार झाला तर आपल्या नावाचा विचार व्हावा असं आठवले यांनी म्हटलं आहे
