खानदेश, पश्चिम महाराष्ट्र संघांची आगेकूच

शिर्डी : झुंजार न्यूज

 

महाराष्ट्र अंध क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने तसेच, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधी मार्फत प्रायोजित केलेल्या अंधांच्या १३व्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत खानदेश व पश्चिम महाराष्ट्र संघांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवत आगेकूच केली. अहमदनगर जिल्हा परिषेदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन केले.

 

दृष्टीहीन खेळाडू आपल्या जिल्ह्यात येऊन खेळत असल्याचा खूप अभिमान वाटत आहे, अशा भावना अहमदनगर जिल्हा परिषेदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांना दृष्टीहीन खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचाहा मोह आवरला नाही. कोरोना संकट काळात स्पर्धा होत नसल्याने अहमदनगर जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय स्पर्धा होत असल्याचेही शालिनीताई यांनी सांगितले. सगळ्या खेळाडूंचे मनोबल वाढवत त्यांना शुभेच्छा दिल्या.

शिर्डीमधील कोकणठाण येथील आत्ममलिक क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत खानदेश विभागाने मुंबई विभागावर १० गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई विभागाच्या फलंदाजांचा खानदेशच्या सुशिल ढेपळेच्या (३/२५) गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही व संघ १४.५ षटकांत १३१ धावांवर आटोपला. मुंबईकडून विशाल अंबलिया (३४) व अरबाझ पटेलने (२०) सर्वाधिक धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या खानदेश विभागाच्या सलामीच्या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. उमेश जाधव (नाबाद ५४) व राहुल महाले (नाबाद ६७) यांनी पहिल्या गड्यासाठी अभेद्य शतकी भागिदारी रचताना खानदेशला १३.४ षटकांत बिनबाद १३२ धावसंख्येपर्यंत पोहोचवत विजय मिळवून दिला.

 

अन्य सामन्यात, पश्चिम महाराष्ट्राने कोकण विभागाचा १६३ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र संघाने कर्णधार अभिजित शिरतोडे (८४) व रोहित भर्गुणेच्या (७२) आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर १५ षटकांत ४ बाद २१४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोकण विभागाच्या फलंदाजांनी निराशा केली. अदनान शेख (१२) वगळता इतर कोणालाही चमक दाखवता आली नाही. त्यामुळे संघाला ९ बाद ५१ धावांपर्यंतच मजल मारता आली. पश्चिम महाराष्ट्रकडून पांडुरंग जांबे (२/२) व दिनेश पाडाळे (२/४) यांनी चांगली गोलंदाजी केली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed