मुंबई । झुंजार न्यूज
अहमदनगर जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने रस्ते विषयक विविध मागण्यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी तत्वत: मंजूरी दिली. यात अहमदनगर-मनमाड रस्त्यादरम्यानच्या डी.एस.पी. चौक आणि एम आय.डी.सी. येथे दोन उड्डाणपुल तथा भुयारीमार्ग बांधणे, शेवगांव येथे बाह्यवळण रस्त्याचे काम करणे, तसेच अहमदनगर शहरातील डी.एस.पी. चौक येथील शासकीय निवासस्थाने ‘बांधा, वापरा, हस्तांतरण करा’ या तत्वावर विकसित करण्याबाबतच्या मागण्यांचा समावेश आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील रस्ते वाहतुकीचे योग्य नियोजन होऊन जनतेला वाहतुकीसाठी अतिशय चांगले आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध होणार आहेत
अहमदनगर जिल्हयातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने आज मुंबई मंत्रालय येथे महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी एक सादरीकरण बैठकीत करण्यात आले. या बैठकीस अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, रस्ते विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, बांधकामे विभागाचे सचिव संजय दशपुते यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते
