मुंबई । झुंजार न्यूज

कृषिमंत्री झाल्यापासून मी अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो आहे. त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. दर दिवशी कृषी विभागाशी संबंधी काही ना काही कार्यक्रम असतो. आज जयहिंद लोकचळवळीच्या युवा शेतकरी सन्मान सोहळ्यासाठी आलो, पण मला कृषी विभागापासून लांब आल्यासारखं वाटतच नाही. कारण या युवा शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे आपल्या काळ्या मातीचा सन्मान आहे, अशी भावना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

 

जयहिंद लोकचळवळीच्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये युवा शेतकरी सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. या सोहळ्याचं अध्यक्षस्थान विधिमंडळातील काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भूषवलं.

राज्यातील अनेक तरुण शेतकरी आपल्या शेतात विविध नवनवीन आधुनिक प्रयोग करत असतात. शेतीसोबतच दुग्ध उत्पादन व पशुपालन, कोंबड्या पालन, मधुमक्षिका पालन, फुल व फलोत्पादन अशा अनेक व्यवसायांमध्ये हे प्रयोग होतात. यापैकी १३ यशस्वी युवा शेतकऱ्यांना यंदा जयहिंद लोकचळवळीचा युवा शेतकरी पुरस्कार जाहीर झाला. जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे आणि संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये रविवारी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या वेळी आमदार सत्यजीत तांबेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली वाहिली. महात्मा गांधींनी देशाला नाही, तर जगालाही अहिंसेचा मार्ग दाखवला. ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही, हे तत्त्व त्यांनी मांडलं आणि त्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होतोय. त्यांनी जे विचार ग्रामीण भागासाठी सबंधं आयुष्यातून देशासमोर ठेवले, ते विचार घेऊन जयहिंद संस्था काम करतेय, हे अभिमानाने सांगावंसं वाटतं, असं मुंडे म्हणाले.

लोकचळवळीतून आमदार झालेला नेता
या वेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार सत्यजीत तांबे यांचंही कौतुक केलं. युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक लढवताना सत्यजीत यांनी गावागावांत मतदान घेतलं आणि ते अध्यक्ष झाले होते. तसंच विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीवेळीही त्यांनी कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसताना लोकांमध्ये उतरून, त्यांचा विश्वास जिंकून निवडणूकही जिंकली. राजकारण अशा पद्धतीनेही करता येतं आणि कोणत्याही पक्षाचा विचार न घेताही निवडणूक जिंकता येते, हा सगळ्यांसाठीच धडा आहे, या शब्दांत मुंडे यांनी सत्यजीत तांबे यांची पाठ थोपटली.

फक्त २४ टक्के तरुणांनाच शेतीत रस
कृषीमंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात त्यांनी किती तरुणांना शेती हा एक व्यवसाय म्हणून करण्यात रस आहे, असं विचारलं होतं. या सर्वेक्षणातून फक्त २४ टक्के तरुणांना शेतीत रस असल्याचं समोर आलं आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत असून शेतीला आणखी जोड-व्यवसाय कसे विकसित करता येतील, याकडे लक्ष देत असल्याचंही मुंडे म्हणाले.

शेतकी विभागाला आधुनिक होण्याची गरज
आपल्याकडे सोयाबीनचं पीक घेतलं जातं. पण सोयाबीनपासून आजकाल दूध, पनीर, टोफू, योगर्ट, पोहे असे अनेक पदार्थ बनतात. पण हे सगळे पदार्थ बनवण्यासाठी सोयाबीनवर प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया आपल्या देशात होत नाही. त्यामुळे सोयाबीनची निर्यात होते आणि प्रक्रिया करून झालेले पदार्थांची आयात होते. परिणामी एका रुपयात उपलब्ध होऊ शकणाऱ्या वस्तूसाठी १५० रुपये मोजावे लागतात. हे चित्र बदलण्यासाठी शेती विभागाला आधुनिक होण्याची गरज आहे, असं कृषिमंत्री म्हणाले.

कृषी विभागाकडे फक्त पेरणी-कापणी
पूर्वी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय अशी सगळीच खाती कृषी या विभागांतर्गत होती. पण आता फक्त शेतीविषयाची पेरणी आणि कापणी, या दोनच कामांचा संबंध येतो. आणखी एक गोष्ट म्हणजे आयएमडीचे हवामानविषयक अहवाल. मी कृषिमंत्री झाल्यापासून एकही दिवस आलेला रिपोर्ट खरा ठरलेला नाही, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. पण जिथे इच्छाशक्ती असते, तिथेच क्रांती घडते. जोपर्यंत कृषीमंत्री म्हणून काम करेन, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

मी एक ऊसतोड मजूर शेतकऱ्याचा मुलगा!
मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. ज्या शेतकऱ्याने प्रसंगी दुष्काळात ऊसतोड मजुरी केली, अशा मजूर शेतकऱ्याचा पोरगा आहे. आजही मी शेती करतो. पण नवनवीन प्रयोग करू शकत नाही. मला शेतकऱ्याचं दु:ख माहिती आहे. माझ्या जीवनाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक लढाया आणि संघर्ष रस्त्यावर उतरून केला आहे. त्यांना त्यातून बाहेर कसं काढायचं, हे देखील माहीत आहे, असं प्रतिपादन मुंडे यांनी केलं. आमच्या घरी गायी-म्हशी असल्या, तरी त्यांचं दूध विकायचं नाही, असा दंडक आहे. असा एक माणूस कृषीमंत्री होऊन शेती व्यवसाय म्हणून करा, असं सांगतो. काळी माती आणि जन्मदात्री या दोघीही माझ्या आयाच आहेत. त्यामुळे जन्मदात्री आईचं म्हणणं मी टाळू शकत नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

धनंजय मुंडे यांच्यासारखा कृषिमंत्री मिळणं भाग्याचं!
अलीकडच्या काळात कृषिमंत्री होणं अनेकांना नकोसं वाटतं. माझ्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा काळ कृषिमंत्रीपदाचा होता. विद्यमान कृषिमत्री धनंजय मुंडे हे म्हणतात की, कृषी हा माझा धर्म आहे. असं म्हणणारा कृषिमंत्री लाभणं ही खरंच आनंदाची बाब आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. तसंच कृषी क्षेत्रातले प्रश्न कधीच संपत नाहीत. पण ते प्रश्न सोडवण्यातला आनंद आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात भेटणं जास्त आनंदाचं असतं, असंही ते म्हणाले. कृषी विद्यापीठांचं काम खूप महत्त्वाचं आहे. ही विद्यापीठं चांगलं काम करतात, मात्र धनंजय मुंडे यांनी त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी

शेळीपालन व्यवसायात यश मिळवणाऱ्या सिन्नर तालुक्यातील मनिषा पोटे, सेंद्रीय पद्धतीने केळ्यांची लागवड करणारे अभिजीत भोंगे, कृषीतज्ज्ञ सचिन होळकर, सेंद्रीय शेती करणारे संजय वाकचौरे, फळबाग आणि रोपवाटिकेत यश मिळवणारे रवींद्र गायकवाड, टोमॅटो उत्पादक संदीप गुंजाळ आणि ईश्वर गायकर, पशु संवर्धन व कृषी व्यवसाय प्रशिक्षक श्रद्धा ढोरमले, फळबाग उत्पादक राजेंद्र मराठे, पोल्ट्री व दूध उत्पादक राजेंद्र मुंगसे आणि दुग्ध व्यवसाय व दुग्ध प्रक्रिया उद्योजक शरद आव्हाड यांना युवा शेतकरी पुरस्कार देण्यात आले.

 

या वेळी माजी आमदार व जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे यांनी मनोगत व्यक्त करताना शेतीमधील गुंतवणूक वाढवावी आणि शेतीला उद्योगाचा दर्जा देत पायाभूत सुविधा वाढवाव्या, अशी मागणी केली. तसंच कार्यक्रमाचं प्रास्ताविक दुर्गा तांबे यांनी केलं.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *