मात्र ही निवडणुक विखे , थोरात यांच्या भोवतीचं फिरणार हे नक्की !
शिर्डी । झुंजार न्यूज
साईबाबा देवस्थानमुळे प्रसिद्ध आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या पराभवामुळे चर्चेत आलेला शिर्डी (राखीव) लोकसभा मतदारसंघ. त्याही पूर्वी तो दिग्गज नेते बाळासाहेब विखे यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. गेल्या दोन-तीन निवडणुकांचे चित्र जर पाहिले तर इच्छुक उमेदवारांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात मारलेल्या उड्यांनी हा मतदारसंघ नजरेत आला आहे . आताही इच्छुकांची नावे पाहिली तर तेच एक वैशिष्ट्ये लक्षात येते. परंतू कोणत्याही पक्षांचे कोणतेही उमेदवार असले तरी लढत अप्रत्यक्षपणे रंगते ती आजी – माजी महसूल मंत्री म्हणजे राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात या दोन परंपरागत विरोधक असलेल्या दिग्गज नेत्यांमध्येच. उमेदवारी ठरवतानाही त्यांच्या भूमिका या महत्वाच्या ठरतात.
सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात ते शिवसेनेचे (शिंदे गट) सदाशिव लोखंडे. शिवसेनेने हा मतदारसंघ गेली सलग तीनवेळा जिंकल्याने महाविकास आघाडीत ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केला त्यानुसार वाकचौरे यांचे दौरे ही होत असून नुकतेचं उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद दौरे करत गद्दारांना घरी बसवा असे आवाहन केले मात्र गद्दार कोण हे लोकांनाचं समजेना. दुसरीकडे कागदपत्रावरील संख्याबळाच्या आधारे मतदारसंघात काँग्रेस प्रबळ दिसते, त्यामुळे जिल्ह्यातील किमान एक जागा तरी काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे तर शिर्डीच्या जागेसाठी आग्रह धरला जात आहे. शिवसेनेतील फुटीपूर्वी भाजपने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत समृद्धी महामार्ग, वंदे भारत रेल्वे, विमानतळाचे सक्षमीकरण, निळवंडे धरण यामार्गे बांधणी सुरु केली होती. मात्र खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने व रिपब्लिकन पक्षाचा वाढता दबाव बघून भाजपच्या प्रयत्नांवर पाणी पडणार हे चित्र दिसत आहे . मला न् तूला घार तिसर्याला असे ही होवू शकते .
पूर्वीचा हा कोपरगाव मतदारसंघ. काँग्रेसचा बालेकिल्ला. बाळासाहेब विखे यांनी आठवेळा विजय मिळवला. त्यातील एकदा शिवसेनेचे उमेदवार म्हणूनही आहे. मतदारसंघ तसा तब्बल ११ सहकारी साखर कारखानदारांच्या साम्राज्यांनी व्यापलेला. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात लक्ष न घालणारा उमेदवार त्यांना हवा असतो. अशा उमेदवाराला साखरसम्राट अनुकूलता दाखवतात. सन २००८ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर शिर्डी नावाने अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. रिपब्लिकन नेते व केद्रींय मंत्री रामदास आठवले यांनी २००९ मध्ये या मतदारसंघातून निवडणूक लढविली. निवडणूक ‘ॲट्रॉसिटी’च्या मुद्द्यावर निवडणूक फिरली आणि आठवले यांना पराभव स्वीकारावा लागला.
रामदास आठवले अद्यापि शिर्डीच्या जागेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी वेळोवेळी तशी इच्छाही प्रकट केली आहे. महायुतीच्या मेळाव्यासह विविध कार्यक्रमातून आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी तशी मागणीही केली होती. आठवले गटाची अधिवेशनेही सातत्याने शिर्डीतच झाली तर फेबूवारीच्या पहिल्या आठवड्यात श्रीरामपूर , कोपरगांव , शिर्डी येथे रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मेळावे झाले पुन्हा ५ मार्चला अकोले , संगमनेर येथे महामेळावे होणार असल्याने रामदास आठवले यांनी तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे तर नुकतीचं केद्रींय गृहमंत्री अमित शहा व भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेवून चर्चा ही झाल्याचे फोटो व्हायरल झाले तर विखे – पिता – पुत्रांनी ही अमित शहाची भेट घेतल्याने भाजपाकडून आठवले यांना ग्रीन सिंग्नल असल्याचे बोलले जात आहे . तर दुसरीकडे ठाकरे गटाशी युती झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याही नावाची चर्चा शिर्डीसाठी अचानकपणे सुरू झाल्याने अन् तसे घडल्यास हा मतदारसंघ आणखी चर्चेत येईल मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांचे काय ?
रामदास आठवले यांचा शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव केला. तेच वाकचौरे त्यानंतर २०१४ ला काँग्रेसकडून , २०१९ पुर्वी भाजपात गेले मात्र तिकड न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणुक लढविली. असा प्रवास झाला. शिवसेना फुटीनंतर सदाशिव लोखंडे हे शिंदे गटाकडे गेल्याने, वाकचौरे यांनी संधी साधत पुन्हा शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले. २०१४ ला त्यांनी शिवसेना सोडली तेंव्हा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला होता. तत्पूर्वी नाशिकचे आमदार बबनराव घोलप यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला होता. शिर्डीचे संपर्कप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. आपल्याला हवे तसे ठाकरे गटाचे पदाधिकारी त्यांनी बदलून घेतले. परंतु उमेदवारीसाठी वाकचौरे यांना झुकते माप मिळाल्याने नाराज घोलप यांनी उपनेते पदाचाच राजीनामाच दिला त्यानंतर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होवू लागल्या . तर दुसरीकडे शिर्डी दौऱ्यातून जनसंवाद घेत ठाकरे यांनी विस्कळीतपणा दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र इच्छुकांची संख्या वाढतचं आहे काँगेसमधून आलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे , रिपाईतून आलेले अशोकराव गायकवाड हे सुद्धा इच्छुक असल्याचे दिसत आहेत
सदाशिव लोखंडे तसे नशीबवान खासदार . जनसंपर्क , काम नसले तरी नशीबाने त्यांना चांगली साथ दिली. कितीही अडचण झाली तरी नेत्यांशी जुळवून घेण्यात तरबेज. तेही भाजप, मनसे, पुन्हा भाजप असा प्रवास करत शिवसेनेत दाखल झाले. बबनराव घोलपांची कायदेशीर अडचण निर्माण झाल्याने, युतीच्या काळात शिर्डीतून शिवसेनेची त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मिळवली आणि विजयी झाले. स्वतःचे कार्यकर्ते नाहीत, यंत्रणा नाही, तरीही कोणत्याही साखर कारखानदारांची अडचण होणार नाही अशा पद्धतीने काम करत त्यांनी मागील दोन्ही वेळेस जुळवून घेतले. मतदारसंघात तसे शिंदे गटाचे अस्तित्व फारसे नाही.
भाजपचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे दोघे दिग्गज नेते याच मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील. दोघांच्या मान्यतेविना उमेदवार ठरणे आणि तो निवडून येणेही अशक्य. यंदा भाजपने अधिकृतपणे ती जबाबदारी विखेंवर टाकली आहे तर काँग्रेसने अप्रत्यक्षपणे थोरात यांच्यावर. नगर जिल्ह्यातील दोनपैकी किमान एकतरी जागा काँग्रेसने लढवावी असा सूर पक्षात आळवला जात आहे.त्यामुळे काँग्रेसने शिर्डीच्या जागेची मागणी केली आहे. परंतु पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही. त्यातूनच श्रीरामपुरचे आमदार लहू कानडे यांचे नाव पुढे आणले जात आहे. अन्यथा हेमंत ओगले, उत्कर्षा रूपवते, राजेंद्र वाघमारे आशा नावांची यादी पक्षाकडे पाठवली गेली आहेत. बाळासाहेब थोरात या जागेसाठी किती आग्रही राहतात, यावर काँग्रेसची भूमिका अवलंबून राहील
नगरच्या जागेवर ‘मविआ’मध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दावा सांगितला असला तरी शिर्डी लोकसभेकरिता चाचपणी सुरु असल्याने त्याच धरर्तीवर ३ जानेवारी आश्वीत बाळासाहेब गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन व शेतकरी मेळावा तर ४ व ५ जानेवारीला शिर्डीत पक्षाचा मेळावा हे कार्यक्रम घेत जणु आपला ही उमेदवार असणार हे संकेत दिल्याने सर्वसामान्य दलित कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड यांचे नाव चर्चेत आले आहे .
समृद्धी महामार्ग, वंदे भारत रेल्वे, विमानतळ सक्षमीकरण, निळवंडे धरण आदीच्या माध्यमातून भाजपने शिर्डी या राखीव मतदारसंघाची बांधणी सुरु केली होती. मात्र हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले अथवा शिवसेनेला (शिंदे गट) द्यावा लागेल. तर ‘मविआ’मध्ये मतदारसंघ कोणाकडे, ठाकरे गट की काँग्रेस? याची रस्सीखेच सुरू आहे. दोन्हीकडे सक्षम उमेदवारीचा शोध घेतला जात असून निचिकेत खरात , राजेंश गायकवाड , सिध्दार्थ मेहेरखांब आदीसह सुशिक्षीत तरुण सुद्धा इच्छुक दिसत आहे .
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय आमदारः
अकोले-डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट), संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस), कोपरगाव-आशुतोष काळे (राष्ट्रवादी, अजितदादा गट), शिर्डी- राधाकृष्ण विखे (भाजप), श्रीरामपुर-लहू कानडे (काँग्रेस), नेवासा-शंकरराव गडाख (अपक्ष, ठाकरे गट).
सन २०१९ च्या निवडणुकीतील मते:
सदाशिव लोखंडे-( शिवसेना) : ४८६८२०
भाऊसाहेब कांबळे- (काँग्रेस) ३६६६२५
भाऊसाहेब वाकचौरे- (अपक्ष) ३५५२६ असे
