तुझी ३२ वर्षे सर्व्हिस असली, तरी माझी प्रत्यक्षात ४० वर्षे थेट जनतेत सर्व्हिस वाकचौरे यांच्यावर लोखंडीची एकेरी टिका !

 

राहाता : झुंजार न्यूज

महायुतीतील भाजपचे जे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असतील त्यांची नाराजी नक्कीच दूर करणार असल्याची स्पष्टोक्ती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाला लागा, असा शब्द दिल्याचे खा. सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मलाच उमेदवारी मिळणार असून, महायुतीतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागले असल्याची माहितीही लोखंडे यांनी या वेळी दिली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत मागील आठ दिवसांपासून रस्सीखेच सुरू असल्याने सदरची जागा कोणाला मिळणार या पार्श्वभूमीवर खा. सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका पहिल्यांदाच स्पष्ट केली. या वेळी नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीन औताडे, जिल्हा संघटक विजय काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, भाजपचे नितीन कापसे, राष्ट्र‌वादी काँग्रेसचे संग्राम कोते, रमेश गोंदकर, नीलेश कोते, संदीप सोनवणे, दीपक गोंदकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित शेळके, नीलेश शिंदे, साई कोतकर, शिवसेना शिंदे गटाचे बाळासाहेब पवार, महिला आघाडीच्या विमल पुंडे, मीनाक्षी वाकचौरे, आरती गाढे, राजश्री वाव्हळ, वनिता जाधव, सुनीता शेळके, विठ्ठल घोरपडे, बाळासाहेब राहाणे, रावसाहेब थोरात, धनंजय जाधव आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
या वेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत मागील आठ दिवसांपासून रस्सीखेच सुरू असल्याने सदरची जागा आता कोणाला मिळणार असा प्रश्न केला असता खा. लोखंडे यांनी, शिर्डीत शंभर टक्के मीच उमेदवार राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाला लागा, असा शब्द दिल्याने त्यांच्या आदेशानुसार महायुतीतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागले असल्याचे सांगितले.
उबाठा गटाचे माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात शिर्डी लोकसभेची तिसऱ्यांदा आमनेसामने फाइट होत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, की माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी तूप घोटाळ्यात दहा लाख रुपये घेतले आहेत. त्यामुळे १० कोटी रुपये घेणारा उमेदबार हवा की नाकारणारा हे मतदारच ठरवतील. आम्ही खोटे बोलत नाही. काम होणार असेल तरच हो म्हणतो, नसेल होणार तर नाही सांगतो, असे स्पष्ट केले. 
“मी पैलवान आहे. माझे पैलवानाचे शरीर आहे, त्याला वाटलं, तर कुस्तीपण खेळू आपण. त्यामुळे माझी कोणतीही तयारी आहे. त्याला वाटतं, मी डबल ग्रॅज्युएट आहे. पण मी देखील लोकसभेत जनतेच्या हिताचे पाहिजे ते काम करू शकतो. तुझी ३२ वर्षे सर्व्हिस असली, तरी माझी प्रत्यक्षात ४० वर्षे थेट जनतेत सर्व्हिस झाली आहे म्हणून आजही माणूस बघितला, की ओळखता येतो. खा. सदाशिव लोखंडे यांनी माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर अशा एकेरी भाषेत टीका केली.
पैसे नाकारणारा खासदार
श्री साईबाबा संस्थानाच्या तूप घोटाळा मी बाहेर काढला होता. हे प्रकरण दडपण्यासाठी मला १० कोटी रुपये देऊ केले होते. त्या वेळी मी काही दलाल नसल्याचे ठणकावून सांगत पैसे नाकारले. त्यामुळे मी १० कोटी रुपये नाकारणारा खासदार आहे, घेणारा नव्हे, असा आरोप शिंदे गटाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शिर्डीत पत्रकार परिषदेत केला.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed