शिर्डी । झुंजार न्यूज

शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यासाठी मोठी अनोखी संधी घेऊन आली आहे. या मतदारसंघात सुमारे ८ लाख महिला मतदार आहेत. महिला मतदारांनी वज्रमूठ बांधल्यास उत्कर्षा रुपवतेंच्या रूपाने मोठा चमत्कार आणि इतिहास घडू शकतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या साडे आठ लाख तर महिला मतदार ८ लाख सात हजार इतकी आहे. तालुकानिहाय महिला मतदारांची संख्या पुढीप्रमाणे आहे. (कंसात आकडेवारी) अकोले (१ लाख २३ हजार १६९), संगमनेर (१ लाख ३४ हजार १९६), शिर्डी (१ लाख ३५ हजार), कोपरगाव (१ लाख ३६ हजार ७९३), श्रीरामपूर (१ लाख ४७ हजार ८३६), नेवासा (१ लाख ३० हजार ७६७). महिला शक्तीचा जागर, सन्मान स्त्री कर्तृत्वाचा, महिला दिवस, जागर आदिशक्तीचा आणि सन्मान मातृत्वाचा अशा राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी मात्र संधी मिळत असतानाही ती न देण्यात याच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी धन्यता मानली आहे. महिलांना निवडणूकीत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय संसदेत बहुमताने सर्व पक्षीयांनी घेतला असला
तरी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडून एकाही पक्षाने महिला उमेदवारास उमेदवारी दिली नाही, याबाबत महिलांमध्ये असंतोष आहे. आता याच महिला चमत्कार करून इतिहास घडविणार आहेत.
या मतदारसंघात आजपर्यंत एकाही महिलेने लोकसभा निवडणुक लढविल्याचे ऐकिवात नाही. मात्र हीच निवडणूक लढविण्यासंदर्भात उत्कर्षा रुपवते यांनी मोठे पाऊल उचलले असून त्यांच्या रूपाने या मतदारसंघाला महिला खासदार होण्याचे महिलांचे स्वप्न साकार होऊ शकते. पक्षांना महिलांची मते चालतात, मात्र महिलांना राजकारणात स्थान देताना अनेक पक्ष अस्पृश्यता पाळतात, अशा अनेक महिलांच्या भावना आहेत. इच्छाशक्ती बरोबरच महिलांनी निश्चय आणि वज्रमूठ बांधल्यास उत्कर्षा रुपवतेंच्या माध्यमातून मोठा चमत्कारच नव्हे तर इतिहासही घडेल. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी देऊन महिलांचा खरा सन्मान केला आहे, अशा लाखो महिलांच्या भावना आहेत. ‘अभी नही तो कभी नहीं’ या ताकतीने मतदारसंघातील प्रत्येक महिला मतदाराने पक्ष विसरून उत्कर्षा रुपवतेंच्या पाठीशी ठामपणाने उभ्या राहिल्यास लोकसभा निवडणुकीत त्यांची लॉटरी लागेल, तसे झाल्यास हा इतिहास मानला जाईल.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *