शिर्डी । झुंजार न्यूज
वंचितच्या माध्यमातून उत्कर्षा रुपवतेंची निवडणुकीत एन्ट्री झाल्यापासून बोलले जात आहे. की, वंचितमुळे महाविकास आघाडीला तोटा होऊ शकतो. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतांचे विभाजन होऊ शकते. मात्र, वास्तवतः काही अंशी हे खरे असले. तरी वंचितमुळे सदाशिव लोखंडे यांना देखील तितकाच फटका बसू शकतो असे गावो – गावी वाड्या वस्त्या मधून सांगितले जात आहे. मात्र, तालुक्यानिहाय मतांची आकडेवारी वेगळी असू शकते. मात्र, तरी देखील नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर आणि अकोले या ठिकाणी वंचित मोठी मतांची आघाडी मिळण्याची शक्यता असून नेवाशात वाकचौरे यांचे तर अकोल्यात लोखंडे यांची मते कमी होतील असे चित्र दिसत आहे. वंचितचे चार डोके सोडले तर अकोल्यातून वंचितला नव्हे तर रुपवते म्हणून मते मिळणार आहेत. मात्र, वंचितचे चिन्ह कुकर तळागाळापर्यंत पोहचले नसले तरी रूपवते नावाची चर्चा होत आहे .

खरंतर वंचित बहुजन आघाडीने शिर्डी मतदारसंघात फार मोठा जीव आणला आहे. हे ही नको आणि तो ही नको म्हणून ज्यांना-ज्यांना पर्याय हवा होता त्यांनी उत्कर्षा रुपवते यांच्यात पक्ष म्हणून नव्हे तर योग्य प्रतिनिधी म्हणून प्रतिबिंब पाहिले आहे. यात फक्त मतदारच नाही. तर, दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी तसेच काँग्रेस आणि भाजपातील नेते कार्यकर्त्यांनी सुद्धा वंचितची री ओढली आहे. त्यामुळे, एकंदर राजकीय वातावरण पाहता ऊत्कर्षा रुपवते यांचा फटका फक्त वाकचौरेना नव्हे तर लोखंडेंना बसणार हे मात्र नक्कीचं .

तर नेवाशातून भाऊसाहेब वाकचौरे यांना शंकरराव गडाख यांच्यामुळे चांगले लिड असणार आहे. मात्र, त्याच ठिकाणी २०१९ मध्ये वंचितचे संजय सुखदन उभे होते. तेव्हा त्यांना नेवाशातून चांगली मते होती. त्यामुळे, तेथे भाऊसाहेब वाकचौरे यांची मते मोठ्या प्रमाणावर वंचित खाणार असल्याचे दिसते आहे. कोपरगावात कोल्हे आणि काळे या दोघांवर लोखंडे यांची धुरा आहे. मात्र, गणेश कारखान्यात काँग्रेसशी युती केलेल्या विवेक काळे यांची भुमिका अद्याप गुलदस्त्यात दिसत आहे. तर तेथील अनेक मतदारांना वाटते की, हा ही नको आणि तो ही नको. त्यामुळे, वाकचौरेंसह लोखंडेंना सुध्दा दगा फटका बसण्याची शक्यता आहे.

तर श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसला चांगला प्रतिसाद आहे. तेथे लोखंडे यांच्या विरोधात वातावरण दिसत असून जी मते काँग्रेसला मिळणार होती. ती दलित आणि मुस्लिम मते वंचितच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. तेथे भाऊसाहेब वाकचौरे यांना चांगलाच तोटा सहन करावा लागणार आहे. कारण, तेथील हिंदुत्ववादी संघटना लोखंडे यांना सपोर्ट करणार असून बौद्ध वंचितमागे एकवटले आहेत. तर, मुस्लिमांनी देखील ऊत्कर्षा रुपवते यांना मदत करण्याचा सामाजिक ठराव घेतला आहे. इतकेच काय.! तर तेथील मनसे आणि अन्य कार्यकर्ते देखील वंचितच्या मागे उभे राहणार असल्याचे दिसते आहे. राहाता तालुक्यातून मात्र विखेंची यंत्रणा प्रामाणिकपणे काम करणार असून तेथे लोखंडे यांना चांलले लीड मिळेल असे स्थानिक मतदारांचे मत आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचितकरिता
श्रीरामपूर, संगमनेर आणि अकोले हे तीन तालुके फार महत्वाची भुमिका निभावणार आहे. यातील दोन तालुक्यात भाऊसाहेब वाकचौरे यांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. तुलनात्मक संगमनेरातून ऊत्कर्षा रुपवते यांना चांगली मते मिळेल असे चित्र आहे. कारण, रुपवते ह्या काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या होत्या. त्यांनी संगमनेरात चांगली माणसेही जमविली आहेत. त्यामुळे, जसे बाळासाहेब थोरात आ. सत्यजित तांबे यांच्या मागे दृश्यस्वरुपात उभे नव्हते. तरी त्यांचे कार्यकर्ते दादांसाठी दिवस रात्र एक करीत होते. तसेच चित्र संगमनेरात दिसण्याची शक्यता आहे. आज देखील काँग्रेसचे पदाधिकारी रुपवते यांचा प्रचार करताना दिसत आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या माजी पदाधिकारी ऊत्कर्षा रुपवते ह्या नक्कीचं भाऊसाहेब वाकचौरे यांची मते खाणार यात तिळमात्र शंका नाही.
हिच स्थिती अकोल्यात वेगळी असणार आहे. कारण, अकोल्यात डॉ. लहामटे व पिचड पिता – पुत्र यांचे प्राबल्य आहे. मात्र, हे कट्टर विरोधक लोखंडेंच्या एकाच व्यासपिठावर दिसले . त्यामुळे, यांचेच कार्यकर्ते संभ्रमात दिसत आहेत. म्हणून तर ज्यांना जे करायचे ते करा अशा प्रकारे नेत्यांनी वर हात केल्याचे दिसत आहे. याचाच फायदा घेत डॉ. लहामटे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते ऊत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारात दिसत आहेत. तर, पिचड यांच्या कार्यकर्त्यांचा अंतर्गत प्रचार सुरु आहे. हे काय राष्ट्रवादी आणि भाजपा बाबत वातावरण नाही. तर, शरद पवार यांच्या गटाचे व काँग्रेस पक्षाचे काही नेते सुद्धा अंतर्गत ऊत्कर्षा रुपवते यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे, ही निवडणुक वाटते तितकी सोपी नाही.
नगर जिल्ह्यात वंचितची फारशी ताकद नाही. लोक उमेदवारांना किंवा रिपाईला पर्याय म्हणून वंचितकडे पाहतात. तर बाबासाहेबांचा नातू म्हणून वंचितशी भावना जोडतात. त्यामुळे, राज्यात वंचितला स्वतःचा अस्तित्व सिद्ध करता आले. म्हणून तर, राज्याच्या नव्हे, देशाच्या राजकारणात वंचित दखलपात्र आहे. मात्र, रिपाईला साधे एक सुद्धा तिकीट भाजपाने दिले नाही. शिर्डीत नाकारुन दक्षिणेच्या मोदीच्या सभेला आठवलेंना निमंत्रण नाही. मात्र रामदास आठवले यांना १० मेला स्वतंत्रपणे बोलविण्यात आल्याने यातून विखे पाटलाचा हेतू काय ? हे समजेनासे झाले आहे . संध्यातरी रिपाईचे नेते विजय वाकचौरे, श्रीकांत भालेराव आणि सुरेंद्र थोरात यांच्यासह अनेकजण नाराज दिसत आहेत. त्यांनी ठरविलेले दिसते की, भाजपाला आता साथ द्यायची नाही. मात्र आठवले आल्यानंतर जांदूची कांडी फिरती की जैसे थे नाराजी रहाते . रिपाईचे दक्षिण , उत्तरेतील अनेक कार्यकर्ते संध्या अलिप्त दिसत आहे दोन्हीकडे झालेल्या अनेक कार्यक्रमातून दिसेनासे झाले . असे हे पहिल्यांदा घडले . मात्र रिपाईला सोप्यात घेवू नका चांगल्या चांगल्याची वाट लावणारी रिपाईचा इतिहास असून नेवाशा पासून ते अकोल्यापर्यंत आणि कर्जत जामखेड, श्रीगोंद्यापासून ते कोपरगाव रिपाईची ताकत फार मोठी व निर्णायक आहे. मात्र, त्यांचे जिल्हयातील नेतेचं संध्या वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.
ऊत्कर्षा रुपवते यांना फार कमी वेळ मिळाल्याने त्यांनी शक्य तितका मतदारसंघ पिंजून काढल्याचे दिसून येत आहे. एक तरुण महिला उमेदवार असल्याने दिवसरात्र प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत रात्री उशिरा पर्यंत जाताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजून देखील त्यांचे कुकर हे चिन्ह पोहचलेले नाही. लोकांना उमेदवार ही माहित आहे. खरेखुरे कुकर ही माहित आहे मात्र, उमेदवाराचे चिन्ह हे कुकरचं आहे हे माहित नाही. त्यामुळे, हक्काचे मतदान त्यांना नावाच्या रुपाने मिळू शकेल असे वाटते . रुपवते यांची जरी यंत्रणा कमी पडताना दिसत आहे. मात्र सोशल मिडीया मार्फत प्रचारात आघाडी दिसत आहे . प्रचाराच्या गाड्या, कार्यकर्ते, गावोगावी बुथ नियोजन याचा आभाव आहे. तर समोरचे दोन्ही उमेदवार हे धनबलाढ्य व मोठ्या पक्षांचे आहेत. त्यामुळे, त्यांच्याकडे पक्षनिधीसह आयते बुथ नियोजन आहे . मात्र जनतेच्या मनात वाकचौरे , लाखंडे नव्हे तर रुपवते असल्याचे दिसत आहे .
