मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा मेळाव्यात युती सरकारवर हल्लाबोल

 

संगमनेर l झुंजार न्यूज

 

राज्यांमध्ये अशांतता असुरक्षितता वाढली असून कायदा सुरक्षा व्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. अमली पदार्थांचा हैदोस सुरू आहे. बदल्यांमध्ये प्रचंड घोटाळे वाढले आहेत. भ्रष्टाचाराचा अतिरिक्त झाला असून मंत्रालय हे त्याचे केंद्र झाले आहे. बेकायदेशीरपणे आलेले हे सरकार राज्यातील जनतेला अजिबात मान्य नसून सध्याच्या युती सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण नाहीतर लाडकी सत्ता हवी आहे अशी घाणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून सर्वांनी एकत्रितपणे लढून या सरकारला बदलून टाका असे आवाहन केले आहे.

 

षण्मुखानंद सभागृह येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी देशाचे ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्रजी पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बंटी पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे ,खा. वर्षा गायकवाड, नसीम खान, शेकापचे जयंत पाटील, आदींसह राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, राज्यात सत्तेवर आलेले सरकार हे बेकायदेशीर आहे. हे सरकार लोकांना मान्य नाही .नैतिकदृष्ट्या भाजपाचे चुकीचे राजकारण आहे. सर्व स्वायत्त संस्था गुलाम बनून त्यांनी राजकारणासाठी वापर केला आहे. लोकशाही आणि राज्यघटनेवर आघात करू पाहणाऱ्या भाजपाची घमेंड महाराष्ट्राने उतरवली आहे.

 

 

केंद्रात आता महाराष्ट्राचा आवाज बुलंद झाला आहे .महाराष्ट्राच्या अनेक वाघिणी संसदेमध्ये सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांच्या पहिल्याच भाषणाने 56 इंच असणाऱ्यांच्या छातीमध्ये आता धडकी भरली आहे

 

 

 

लोकशाही व घटना मोडीत काढणे हा भाजपाचा हेतू असून तो अजून संपलेला नाही. अजूनही लोकशाहीवर आघात होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे

 

राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी वाढली आहे. सरकारचे त्याकडे लक्ष नाही. कुर्ला येथील हजारो कोटींची जमीन अवघ्या 25% दराने चार शब्दांच्या एका ओळीने  दिली आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजबारा उडाला आहे. सत्ताधारी आमदार गोळीबार करतो आहे. बदल्यांमध्ये प्रचंड घोटाळे होत आहे .भ्रष्टाचाराचा अतिरेक झाला आहे आणि याचे केंद्र मंत्रालय ठरले आहे.

 

खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीत असून जे विविध चौकशीच्या भीतीने केले त्यांची अवस्था जनतेला माहित आहे. म्हणून या  बेकायदेशीर सरकारला सर्वांनी खाली खेचले पाहिजे.

 

याउलट कोरोनाच्या संकटामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अत्यंत चांगले काम झाले. राज्याची जबाबदारी अडचणीमध्ये सांभाळली. सत्तेवर आल्यानंतर अवघ्या आठच दिवसांमध्ये शेतकऱ्यांना विनाआट दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली.

 

महाविकास आघाडी सरकार हे लोकांच्या मनातील असून सध्याचे राज्यातील बेकायदेशीर सरकार सर्वांनी एकत्र येऊन खाली खेचावे असे आवाहनही त्यांनी केले

 

 


यावेळी जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार , माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री आदित्य ठाकरे,खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे ,खासदार वर्षाताई गायकवाड, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींसह विविध नेत्यांनी महायुती सरकार व भाजपावर जोरदार टीका केली.

 

या बैठकीला राज्यभरातील महाविकास आघाडीने व इतर घटक पक्षातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *