अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर गेल्या अनेक दशकांपासून ‘विखे’ नावाचे वलय कायम आहे. मात्र, २०१९ मध्ये राज्याचे दिग्गज नेते नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्याचे राजकीय समीकरण केवळ बदलले नाही, तर ते पूर्णपणे ‘विखेमय’ आणि ‘भाजपमय’ झाले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाचा आणि जिल्ह्याला दिलेल्या योगदानाचा घेतलेला हा आढावा.

विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळाली. केवळ आपला बालेकिल्ला राखणे इतपतच ते मर्यादित राहिले नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यात राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील या पिता-पुत्रांच्या जोडीने यश मिळवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विखे पाटील यांनी जिल्ह्याची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली असून, कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, या ‘विखे पॅटर्न’मुळे आज जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे घट्ट झाली आहेत.

आजमितीस अहिल्यानगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा ठरला आहे. जिल्ह्यात एकूण १९ आमदार (१२ विधानसभा आणि ७ विधान परिषद) असून, त्यापैकी सर्वाधिक ९ आमदार एकट्या भाजपचे आहेत. ही आकडेवारी विखे पाटील यांच्या संघटन कौशल्याची मोठी साक्ष देते. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान राखत आणि नव्या दमाच्या तरुणांना संधी देत त्यांनी जिल्ह्याची मोट बांधली आहे. यामुळेच आज जिल्ह्यात भाजपमध्ये ‘विखे’ हाच शब्द प्रमाण मानला जात आहे.

विखे पिता-पुत्रांची घोडदौड केवळ विधानसभा किंवा लोकसभेपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीतही त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि नगरपंचायतींवर आज भाजपचा भगवा फडकत आहे. अहमदनगर महापालिकेतही भाजपने २५ जागा जिंकून आपली दमदार उपस्थिती दर्शवली आहे. संगमनेर असो वा पारनेर, नेवासा असो वा राहुरी, प्रत्येक मतदारसंघात विखेंच्या रणनीतीचा प्रभाव आज जाणवत आहे.

पद्मविभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी जिल्ह्यात सहकारी संस्था आणि कार्यकर्त्यांचे जे जाळे निर्माण केले होते, त्याला आधुनिक राजकारणाची जोड राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्रांती घडवली, तर शिक्षण , परिवहन , पणन , गृह निर्माण , महसूल, कृषी आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम करताना जनहिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले. ‘शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी’ हे त्यांचे ब्रीदवाक्य राहिले आहे. कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा हटवण्याचे स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सध्या युद्धपातळीवर नियोजन करत आहेत.

विखे पाटील यांच्या कामाची एक खास शैली म्हणजे त्यांचा ‘जनता दरबार’. दर महिन्याला जनता दरबार भरवून तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचे प्रश्न तातडीने मार्गी लावणे, ही त्यांच्या कार्याची पद्धत आहे. थेट जनतेशी संपर्क साधून प्रशासकीय कामातील अडथळे दूर करण्याच्या या पद्धतीमुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आहे. नवउद्योजकांना प्रोत्साहित करणे आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात.

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी असलेले उत्तम ट्युनिंग जिल्ह्याच्या विकासासाठी पूरक ठरले आहे. केंद्रातील मोदी सरकारची विकासकामे आणि राज्यातील महायुती सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात विखे पिता-पुत्र आघाडीवर आहेत. जिल्ह्यातील दोन-तीन तालुके वगळता उर्वरित सर्व भागात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. ‘शत-प्रतिशत भाजप’ हे स्वप्न आता केवळ घोषणा नसून ती अहिल्यानगरमधील वस्तुस्थिती बनत चालली आहे.

आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस. विकासाची दृष्टी, सहकाराचा पाया आणि सक्षम संघटनात्मक बांधणी या जोरावर ते जिल्ह्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवत आहेत. आगामी काळातील निवडणुकांमध्ये विखे पिता-पुत्रांचा हा ‘राजकीय धडाका’ विरोधकांसाठी नक्कीच चिंतेचा विषय ठरणार आहे.

अशा या लोकनेत्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शुभेच्छुक:

श्री. सागर शेठ गीते ( संस्थापक : न्याय डेअरी )

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *