संगमनेर | झुंजार न्यूज

रक्षाबंधनानिमित्त सौ दुर्गाताई तांबे यांच्या निवासस्थानी आमदार बाळासाहेब थोरात यांनी रक्षाबंधन केले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधीशी ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे राजकारण होणे दुर्दैवी आहे. हा निस्वार्थी प्रेमाचा संदेश देणारा जगाला आदर्शवत असा सण आहे.
सध्या राज्य सरकारकडून शासकीय खर्चामध्ये राजकीय प्रचार केला जात आहे. विविध कार्यक्रमांना शासकीय कर्मचारी अंगणवाडी सेविका अशा सेविका यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती केली जात आहे. यातून महिलांचे व स्थानिक नागरिकांचे हाल होत आहे.

मागील पाच वर्षात महाराष्ट्रात झालेले राजकारण हे कसे नसावे याचे उदाहरण आहे. पातळी सोडून राजकारण होत आहे. विरोध विचारांचा असावा पण व्यक्तिगत नसावा. जिव्हाळ्याची माणसे विरोध करत आहेत. हे दुर्दैवी आहे असे घडू नये.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने पुढे लांबवले आता विधानसभेच्या निवडणुका ही पुढे ढकलले आहेत खरे तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे मात्र सध्या होत असलेले निर्णय हे देशाच्या आणि लोकशाहीच्या हिताचे नाही.

अनेक जण काँग्रेस पक्ष सोडून गेले म्हणून पक्ष संपत नाही. पक्ष वाढतो आहे. नव्यांना संधी मिळत आहे. नांदेड मध्ये मोठमोठे नेते सोडून गेले मात्र जनता काँग्रेस बरोबर आहे याचे उत्तम उदाहरण आहे. काँग्रेस हा देश हिताचा विचार व देश हिताचे तत्त्वज्ञान असल्याने जनतेचा कायम मोठा पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.
