बीड l झुंजार न्यूज
बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सव २०२४ कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. यावेळी देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बैलगाड्यातून वाजत गाजत आमचे भव्य असे स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांवर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमो कृषी किसान सन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्यात आला.

यावेळी बोलताना, परळी येथे आलो की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. याच मातीत शेतकऱ्यांसाठी अतिशय सुंदर कृषी प्रदर्शन भरवण्यात आल्याबद्दल कृषी मंत्र्यांच्या टीमचे विशेष कौतुक करून समाधान व्यक्त केले. या प्रदर्शनात अनेक पीक, बियाणे, अवजारे, आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन यंत्रे तसेच उत्तम मार्गदर्शन मिळणार आहे. पारंपरिक शेतीला नाविन्याची जोड दिल्याशिवाय आता अधिक उत्पन्न मिळवणे अशक्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हे कृषी प्रदर्शन निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे मत व्यक्त केले.

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेद्वारे राज्याकडूनही ६ हजार रुपये दिले, एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत केली, सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानासाठी नुकसान भरपाई दिली, गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली, १ रुपयात पीक विमा देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. साडे सात एचपी पर्यंत वीज वापरणाऱ्या शेतकऱ्याला वीज बिल माफ केले असे अनेक शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याचे याप्रसंगी नमूद केले.

यावेळी राज्यात लाडकी बहीण, लाडका भाऊ नंतर आपल्या अन्नदात्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान सुरू करणार असल्याचे जाहीर केले. तसेच कापूस, सोयाबीन आणि दुधाच्या भुकटीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय स्तरावर बैठक घ्यावी अशी विनंती केंद्रीय कृषिमंत्र्यांना केली. त्याचप्रमाणे कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी हेक्टरी ५ हजार रुपयांपर्यंत मदत देण्यासाठी ई- पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा केली. ज्यांच्या सातबाऱ्यावर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अशी नोंद असेल त्यांना याचा लाभ देण्यात येईल असेही यासमयी जाहीर केले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार पंकजा ताई मुंडे, आमदार सुरेश धस तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि राज्यभरातून आलेले शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

