आमदार अमोल खताळ यांचा पुढाकार; पशुपालक व शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील पशुपालक आणि शेतकऱ्यांना वर्षभर दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध व्हावा तसेच जनावरांच्या वैरणीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, या उद्देशाने आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत असून तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.

सध्या बदलत्या हवामानाचा शेती आणि पशुपालन व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. अनियमित पाऊस, वाढते तापमान आणि चाऱ्याची कमतरता यामुळे पशुपालकांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात हिरव्या चाऱ्याची टंचाई भासत असल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी पौष्टिक, मुबलक आणि वर्षभर उपलब्ध राहील असा हिरवा चारा उत्पादनाला चालना मिळावी, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

 

 

योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वैरण पिकांच्या बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे. या बियाण्यांच्या माध्यमातून शेतकरी स्वतःच्या शेतात चारा पिकांचे उत्पादन वाढवू शकतील. त्यामुळे जनावरांसाठी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार असून पशुधनाचे संगोपन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. तसेच पशुपालकांच्या आर्थिक खर्चातही बचत होण्यास मदत होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संगमनेर पंचायत समितीच्या पशुसंवर्धन कार्यालयाशी अथवा तालुक्यातील २४ पशुसंवर्धन दवाखान्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी पुंडलिक येवले यांनी केले आहे.

अनेक भागांमध्ये हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. काही शेतकऱ्यांकडे जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध असला तरी अनेक पशुपालकांना चाऱ्याअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. पशुपालकांच्या या समस्येची दखल घेत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत प्रोत्साहनपर वैरण बियाणे वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात दर्जेदार वैरण पिकविण्याची संधी मिळणार असून वर्षभर जनावरांसाठी पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध राहण्यास मदत होईल. पशुधनाचे आरोग्य चांगले राहून दूध उत्पादन वाढण्यासही हातभार लागेल. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी आणि पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम करावा.

 

अमोल खताळ, आमदार

………………………

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *