{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

आश्वी । झुंझार न्यूज

महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत रंगलेल्या राजकीय घडामोडींवरून आता वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार हल्ला चढवला आहे. “इतरांना भाजपची ‘बी टीम’ म्हणणाऱ्या महाविकास आघाडीने आता भाजपची ‘ए टीम’ म्हणून काम करायला सुरुवात केली आहे,” अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते यांनी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटावर निशाणा साधला आहे.


विधान परिषदेच्या एकूण १७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. १७ पैकी ८ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामुळे अनेक जागांवर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा मार्ग सुकर झाला आहे. याच मुद्द्यावरून उत्कर्षाताई रूपवते यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


प्रसिद्धी पत्रकात उत्कर्षाताई रूपवते यांनी म्हटले आहे की, “विधान परिषद निवडणुकीत महाराष्ट्रात जो ‘बिनविरोध पॅटर्न’ राबवला जात आहे, तो प्रत्यक्षात भाजपला मदत करण्याचा प्रयत्न आहे. १७ पैकी ८ जागांवर माघार घेऊन महाविकास आघाडीने भाजपचे काम सोपे केले आहे. जनतेसमोर भाजपविरोधी असल्याचे भासवायचे आणि पडद्यामागे त्यांनाच मदत करायची, हा दुटप्पीपणा आता उघड झाला आहे.”


महाविकास आघाडीकडून वारंवार वंचित बहुजन आघाडी किंवा इतर छोट्या पक्षांना भाजपची ‘बी टीम’ म्हणून हिणवले जाते. या टीकेचा समाचार घेताना रूपवते म्हणाल्या, “आता जनतेला स्पष्ट दिसत आहे की, खरी ‘ए टीम’ कोण आहे. काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) हे पक्ष भाजपला पूरक ठरेल अशीच भूमिका घेत आहेत. त्यांनी लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणे थांबवावे आणि आपण भाजपला मदत करत आहोत, हे जाहीरपणे मान्य करावे.”

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपला जो फायदा झाला आहे, त्याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीतही उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


आता या आरोपांवर महाविकास आघाडीचे नेते काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *