27 सप्टें. ला हजारो युवक गड किल्ले स्वच्छता व श्रमदानाचा महासंकल्प करणार
संगमनेर l झुंजार न्यूज
संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून राज्यातील गड किल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्रातील तरुणांचे आयकॉन तथा नाशिक पदवीधर मतदार संघाचे युवा आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त 27 सप्टेंबर रोजी किल्ले शिवनेरीवर राज्यभरातील हजारो तरुण स्वच्छता व महाश्रमदान करणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत गड किल्ल्यांचे अत्यंत मोठे महत्व राहिले आहे . खऱ्या अर्थाने महाराजांचे स्मारक हे सर्व गड किल्ले असून ते पुढील पिढ्याकरता सदैव प्रेरणादायी ठरावे याकरता या सर्व गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे याकरता आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्यभरातील हजारो युवक स्वच्छता व श्रमदानाचा महासंकल्प करणार आहेत.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, राज्याचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ.डॉ.सुधीर तांबे व सौ दुर्गाताई तांबे यांच्याकडून समाजकारण आणि पुरोगामी विचारांचे बाळकडू घेत आमदार सत्यजित तांबे यांनी तरुणांसाठी सातत्याने काम करून राज्यभरात मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. शुक्रवार 27 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर स. 8 वा. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे राज्यभरातील हजारो युवकांसह महाराजांना अभिवादन करणार आहे. यानंतर सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व श्रमदान अभियान राबवले जाणार आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सांगणारे नाटक व पोवाडे सादर होणार आहेत.

यानंतर आलेल्या सर्व तरुणांना राज्यभरातील सर्व गड किल्ले संवर्धनाच्या स्वच्छता व संवर्धनाची शपथ दिली जाणार आहे . या दिवशी उपस्थित हजारो युवक स्वच्छता व श्रमदानाचा महासंकल्प घेऊन या पुढील काळात काम करणार आहेत.

हा अभिनव उपक्रम नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी असून या महास्वच्छता व श्रमदान अभियानात राज्यभरातील हजारो युवक व युवतींनी मोठा सहभाग नोंदवावा असे आवाहन जयहिंद लोकचळवळ व गड किल्ले संवर्धन अभियान समितीच्या वतीने करण्यात आले आहे
Post Views: 870

