शिर्डी । झुंजार न्यूज
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजून उमेदवारी अर्ज दाखल झाले मात्र दिवाळीचे फटाके फुटल्यानंतर प्रचाराचे नारळ फुटणार ! होणाऱ्या बहुचर्चित लढतीत शिर्डीत कुणाचे पारडे जड भरणार यावर चर्चा सुरू आहे. शिर्डीत साईबाबांसह मतदार राजा कुणाला पावणार हे समोर येईल. राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागणार की, पुन्हा एकदा ते सर्वांना मात देणार हे स्पष्ट होईलचं.

अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण आता अहिल्यानगर झाले आहे. त्याची सर्वात अगोदर माहिती ट्विट करून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत दक्षिण अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपला खातं सुद्धा उघडता आले नाही. त्यांचा मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर आता शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी विखे कुटुंबियांनी पायाला भिंगरी लावून वातावरण निर्मिती केली. या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी महाविकास आघाडीचे जोरदार प्रयत्न सुरू असून माजी आमदार चंद्रभान घोगरे यांच्या सूनबाई प्रभावती घोगरे यांनी कॉग्रेसकडून उमेदवारी दाखल केली तर दुसरीकडे हा बालेकिल्ला टिकवण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील शर्थीने प्रयत्न करत आहेत. सलग सहा वेळा विखे पाटील यांनी या मतदारसंघात करिष्मा दाखवला आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ही कंबर कसली आहे. त्यामुळे या मतदारसंघात रंगतदार लढतीची शक्यता आहे
शिर्डी लोकसभा मतदार संघात मोठा उलटफेर झाला. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील परभावाचा मोठा धक्का महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बसला. भाजपला खातं सुद्धा उघडता आलं नाही. त्यामुळे शिर्डी विधानसभा निवडणुकीत परभावाचा वचपा काढण्याचा प्रयत्न विखे पाटील करतील. श्री साईबाबा देवस्थानमुळे हा मतदारसंघ राजकीय पटलावर कायम चर्चेत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2009 ला पिपाडाचा 13000 मताने जिंकली , 2014 ला शिवसेना उमेदवार अभय शेळके यांचा पराभव केला होता. त्यांनी 70 हजारांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली होती.2019 ला काँग्रेसचे सुरेश थोरात यांचा 87 हजार मताधिक्यांनी विखे पाटील यांनी मोठा विजय मिळवला.
पण राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडल्या. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये डेरेदाखल झाले. काँग्रेस आता पक्ष बदलाचा वचपा काढण्यासाठी आसूसलेली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विखे पाटील यांच्याविरोधात प्रभावती घोगरे यांच्या रुपाने तगडा उमेदवार दिला आहे. शिर्डी मतदारसंघात विखे पाटील यांच्या कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांच्या नावाची वर्षभर चर्चा झाली. बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांच्या कुटुंबियांचे चांगले संबंध आहे.
शिर्डी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून प्रभावती घोगरे तर महायुतीकडून राधाकृष्ण विखे असा सामना रंगण्याची शक्यता असली तरी आजी – माजी महसूलमंत्र्यांच्या प्रतिष्ठेची ही लढत राज्यभर गाजणार हे मात्र निश्चित तर दुसरीकडे विखे पाटील लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पायाला भिंगरी लावून काम करत असून संगमनेरमध्ये ही जातीने लक्ष्य देवून थोराताच्या विरोधात तरुण उमेदवार दिला असला तरी शिर्डीमधून जुन्या नव्याचे आवाहन सुध्दा विखे पाटील यांच्यासमोर असण्याची चित्र दिसत आहे .
जातीय समीकरणं महत्त्वाची
शिर्डी विधानसभा निवडणुकीत मराठा, माळी, धनगर , दलित , आदीवाशी हे जातीय समीकरणं महत्त्वाचे ठरते. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाने अनेक लोकसभा मतदारसंघातील अंदाज पार धुडकावले. आता विधानसभेत ही मराठा फॅक्टर महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. पण या मतदारसंघात विखे पाटील यांची पाळंमुळं घट्ट आहेत. भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा एकवेळ फटका पण बसू शकतो.
महाविकास आघाडीचा उमेदवार प्रभावती घोगरे यांनी डॉ जयश्रीताई थोरात यांच्या बरोबर फिरून प्रचाराची सुरुवात ही केली . तर विखे पिता – पुत्रांनी हा मतदारसंघ पुन्हा पुन्हा पिंजून काढल्याने आजमितीला त्यांची जमेच्या बाजू दिसून येत आहे तर लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या पैसे बहिणींनी जपून ठेवत दिवाळीत त्यांचा वापर केल्याचे महिला सांगत असल्याने ही एक जमेची बाजू दिसण्याचे चिन्ह दिसत आहे .






